संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
उदगीर (एल पी उगीले) येथील
संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन अत्यंत उत्साहात व उपक्रमशील वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व सर्वसामान्य जनतेसाठी सतत मदतीचा हात पुढे करणारे सुधीर भाऊ भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील मानकीकर यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव निटूरे होते. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका अनिता जगताप, विज्ञान विषयाच्या विशेष शिक्षिका उषा किरण खुळे तसेच डी. एस. बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण केले. या प्रयोगांमधून विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना, संशोधनात्मक दृष्टिकोन व वैज्ञानिक विचारसरणीचे प्रभावी दर्शन घडले. विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित देखणे नाट्यरूप सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विज्ञानावर आधारित नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. अनेक विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रज्ञांची माहिती व त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात गोविंदराव निटूरे यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा व जीवनात विज्ञानाची कास धरावी, असे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका अनिता जगताप यांनी विद्यार्थ्यांनी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक कृतीत विज्ञानाचा विचार करून प्रयोगशील वृत्ती विकसित करावी, असा मोलाचा सल्ला दिला.
प्रमुख पाहुणे सुधीर भाऊ भोसले यांनी विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करताना, “सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे नवनवीन बदल अनुभवतो तेच विज्ञान होय,” असे सांगून विद्यार्थ्यांना विज्ञानाची विविध उदाहरणे दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले सर्व प्रयोग पाहुण्यांनी पाहिले व संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर ही मराठी सेमी-माध्यमाची गुणवत्तापूर्ण व आदर्श शाळा असल्याचे गौरवोद्गार काढले. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कु.श्रीशैल्य मोरे व कु. सोनाक्षी पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन विनोद कोयले सर यांनी मानले.

Post a Comment
0 Comments