Type Here to Get Search Results !

मराठी भाषा म्हणजे आईच्या जाणिवा – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 मराठी भाषा म्हणजे आईच्या जाणिवा – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे



लातूर (प्रतिनिधी): मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लातूर जिल्हा परिषद, लातूर यांच्या वतीने आयोजित 'मारवा : माय मराठीचा अभिजात दरवळ' या निमंत्रित कवी संमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी भाषा म्हणजे आईच्या जाणिवा आहेत. ती हृदयातून येते, त्यामध्ये कसलीही कृत्रिमता नसते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कवीवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी जिल्हा परिषद प्रांगणात कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

निमंत्रित कवी रवींद्र केसकर (धाराशिव), प्रभाकर साळेगावकर (माजलगाव), डॉ. बालाजी इंगळे (उमरगा), राहुलदेव कदम (नळेगाव) यांनी काव्यमैफल रंगवली. शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी स्वरचित कविता सादर केली. ज्ञानप्रकाश बालविकास विद्यालयातील कर्मण्य खिचडे या विद्यार्थ्याने एकपात्री नाटिका सादर केली, तर कु. नंदिनी कुलकर्णी व कु. उर्वी बिराजदार यांनी स्वरचित कविता सादर केल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना म्हणाले, मराठी ही केवळ संवादाचे माध्यम नसून हृदयाची भाषा आहे. जनसामान्यांचा आत्मा आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा मराठी माध्यमाच्या असून, सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. मराठी भाषा संवर्धनात शिक्षकांचे मोठे योगदान आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विवेक सौताडेकर यांनी केले. धन्यकुमार शिंदे, शिवाजी हांडे, विकास सरकाळे, तेजस शेरखाने, दत्तात्रय माळकर, सतीश भापकर, महेश शिंदे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व रसिक श्रोते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments