चिमुकली हुरेन बिलाल मोठ्या आजारात सापडली; रामचंद्र तिरुके ठरले देवदूत!
उदगीर ( श्रीधर सावळे ) – उदगीर तालुक्यातील हाळी येथील बिलाल भाई डांगे हे सर्वसामान्य कुटुंबातील कष्टकरी व्यक्तिमत्त्व. पान टपरी व पान-सुपारी व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परमेश्वराच्या कृपेने त्यांच्या घरी चिमुकली हुरेन बिलाल डांगे हिचा जन्म झाला आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मात्र नियतीने वेगळाच डाव साधला. काही दिवसांपूर्वी चिमुकल्या हुरेनच्या कपाळातून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीत गंभीर समस्या असल्याचे निदान झाले. ही समस्या वाढल्यास भविष्यात मेंदूविकाराचा धोका संभवतो, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यासाठी तातडीची आणि अत्यंत खर्चिक शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. लाखो रुपयांचा खर्च ऐकून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. रोजीरोटीची चिंता असलेल्या या कुटुंबासमोर मोठे धर्मसंकट उभे राहिले.
संकटाच्या क्षणी बिलाल भाई यांनी आपल्या जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधी रामभाऊ तिरुके यांची आठवण काढली. लोकांच्या तोंडी “देवमाणूस” म्हणून ओळख असलेले रामभाऊ तिरुके यांनीही क्षणाचाही विलंब न लावता हाळी येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी आई-वडिलांना धीर देत उपचाराची जबाबदारी उचलली.
रामभाऊ तिरुके यांनी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत लातूर येथील डॉक्टर हळणीकर यांच्या रुग्णालयात संपर्क साधला. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ही शस्त्रक्रिया करता येऊ शकते, याबाबत सविस्तर चर्चा केली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला.
रामभाऊ तिरुके यांची तळमळ आणि आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे दाखवलेली आपुलकी पाहून डॉक्टरांनीही सकारात्मक प्रतिसाद देत हुरेनच्या शस्त्रक्रियेसाठी तयारी दर्शवली. सध्या उपचार प्रक्रिया सुरू असून चिमुकली हुरेनच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.
या घटनेमुळे सामान्य नागरिकांसाठी शासनाच्या योजना किती उपयुक्त ठरू शकतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. संकटाच्या काळात धावून जाणारे प्रतिनिधी समाजासाठी खरे देवदूतच ठरतात, अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.


Post a Comment
0 Comments