Type Here to Get Search Results !

धडाकेबाज कारवाई : आंतरजिल्हा मोटारसायकल चोर अटकेत, १.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

 धडाकेबाज कारवाई : आंतरजिल्हा मोटारसायकल चोर अटकेत, १.७० लाखांचा मुद्देमाल जप्त



लातूर | प्रतिनिधी

लातूर जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडाकेबाज कारवाई करत आंतरजिल्हा स्तरावर चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत एकूण ०६ मोटारसायकली (अंदाजे किंमत १ लाख ७० हजार रुपये) जप्त करण्यात आल्या असून, लातूर आणि पुणे शहरातील विविध गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती. दरम्यान, २२ मार्च रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नवीन रेणापूर ते रेल्वे स्टेशन मार्गावरील बायपास रोडवर एक इसम चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी थांबलेला असल्याची माहिती मिळाली.

माहितीची खात्री करून पोलिसांनी सापळा रचत सायंकाळी साडेचारच्या सुमारास छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव महादेव शिवाजी गरड (वय २६, रा. अंबुलगा, ता. चाकूर, जि. लातूर) असे सांगितले. त्याच्याकडे असलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने लातूर शहरातील विविध भागांतून तसेच पुण्यातील सिंहगड रोड आणि धायरी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार अजिंक्य सिटी परिसरातून आणखी ०५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने होंडा युनिकॉर्न व शाईन या मोटारसायकलींचा समावेश आहे.

तपासादरम्यान जप्त मोटारसायकली या शिवाजीनगर, गांधी चौक, एमआयडीसी (लातूर) तसेच सिंहगड (पुणे) पोलीस ठाण्यातील एकूण ०६ गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय आरोपीने पुण्यात आणखी ०५ मोटारसायकली चोरी करून विक्री केल्याची कबुली दिली असून, त्या संदर्भात पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोउपनि राजेश घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, मोहन सुरवसे, राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे आणि शैलेश सुडे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, लातूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या वाहनांची योग्य सुरक्षा करावी, लॉकिंग प्रणालीचा वापर करावा तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे.

Post a Comment

0 Comments