Type Here to Get Search Results !

लातूर जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई : उदगीर तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा, ११ आरोपींवर गुन्हा – २३.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

 लातूर जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई : उदगीर तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा, ११ आरोपींवर गुन्हा – २३.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त



लातूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगारविरोधी विशेष मोहिमेत पोलिसांनी मोठी कारवाई करत उदगीर तालुक्यातील मन्ना (उमरगा) शिवारातील जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या धाडीत ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर ५ आरोपी फरार आहेत. पोलिसांनी एकूण ₹२३ लाख ४१ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वाढवणा (बु) येथील पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. दिनांक २२ मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मन्ना शिवारात संजय पाटील यांच्या शेताजवळ काही जण “तिर्रट” हा जुगार खेळत असल्याचे समोर आले. माहितीची खात्री करून पोलिसांनी दुपारी सुमारे ३.१५ वाजता घटनास्थळी धाड टाकली.

छाप्यात आरोपी पत्त्यांच्या साहाय्याने जुगार खेळत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून ₹२१,५०० रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच १० चारचाकी व दुचाकी वाहने (अंदाजे किंमत ₹२३.२० लाख) जप्त केली.

🔹 अटक आरोपींमध्ये संभाजी पाटील, शिवकांत मिरजगावे, शिवकुमार शेळके, लईकोद्दीन चौधरी, विलास दहीकांबळे आणि ज्ञानेश्वर सारोळे यांचा समावेश आहे.

🔹 फरार आरोपींमध्ये अजित राठोड, बालाप्रसाद ऊर्फ प्रविण गिल्डा, गोविंद चव्हाण, पवन गिल्डा व ऋषिकेश वाघमारे यांचा समावेश आहे.

या प्रकरणी वाढवणा (बु) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९/२०२६ नोंदवून महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार बळदे करीत आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली. अटक आरोपींवर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.

👉 जिल्ह्यातील बेकायदेशीर जुगार व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत या धाडीतून मिळत आहेत.

Post a Comment

0 Comments