Type Here to Get Search Results !

भावाच्या संसाराला दिला आधार; अविवाहित तरुणाचा वहिनीशी विवाह, माणुसकीचा अनोखा आदर्श

 भावाच्या संसाराला दिला आधार; अविवाहित तरुणाचा वहिनीशी विवाह, माणुसकीचा अनोखा आदर्श



किनवट (प्रतिनिधी):

आजच्या काळात जिथे रक्ताच्या नात्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे, तिथे किनवट तालुक्यातील वझरा (बु.) येथील एका तरुणाने माणुसकी, कर्तव्यभावना आणि कौटुंबिक जबाबदारीचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

वझरा (बु.) येथील प्रफुल्ल पाटील या अविवाहित तरुणाने आपल्या दिवंगत भावाच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा मोठा निर्णय घेत, आपल्या वहिनी विजयालक्ष्मी यांच्याशी विवाह केला. या निर्णयामुळे पोरक्या झालेल्या दोन लहान मुलांना पुन्हा पितृछत्र मिळाले असून, संपूर्ण कुटुंबाला नवसंजीवनी मिळाली आहे.

प्रफुल्ल यांचे मोठे भाऊ अष्टपाल पाटील यांचे फेब्रुवारी २०२६ मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पत्नी विजयालक्ष्मी, एक ८ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांचा अंध मुलगा असा परिवार निराधार झाला होता. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे मुलांचे शिक्षण, संगोपन आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

ही परिस्थिती पाहून धाकटा भाऊ प्रफुल्ल पाटील यांनी केवळ सहानुभूती व्यक्त न करता, प्रत्यक्ष कृतीतून कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या वहिनीला जीवनसाथी म्हणून स्वीकारत, पुतण्या-पुतणीच्या भवितव्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.

प्रफुल्ल हे व्यवसायाने ऑटोरिक्षा चालक असून, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी आहे. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी कुटुंबाच्या हिताला प्राधान्य दिले. समाजातील काही प्रथांना छेद देत त्यांनी घेतलेला हा निर्णय खरोखरच धाडसी आणि अनुकरणीय आहे.

आज सर्वांच्या साक्षीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यामुळे कुटुंबाला नवजीवन मिळाले असून, गावकऱ्यांकडून प्रफुल्ल यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वतःच्या सुखाचा त्याग करून रक्ताच्या नात्याला आणि माणुसकीला जपणाऱ्या प्रफुल्ल पाटील यांच्या या कृतीने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

Post a Comment

0 Comments