Type Here to Get Search Results !

जोडधंद्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती शक्य नाही”-आ. रमेशआप्पा कराड

 “जोडधंद्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती शक्य नाही”-आ. रमेशआप्पा कराड



लातूर  (प्रतिनिधी) जिल्ह्यातील 

रेणापूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सर्व सोयींनी सुसज्ज पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या अद्ययावत इमारतीमुळे शेतकऱ्यांच्या पशुधनासंबंधी अडचणी दूर होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत, शेतीला जोडधंदा केल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती शक्य नाही, असे प्रतिपादन भाजपाचे नेते तथा लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी केले.

पशुसंवर्धन विभागामार्फत उभारण्यात आलेल्या या भव्य दोन मजली इमारतीचे लोकार्पण शनिवारी सकाळी आ. रमेश आप्पा कराड यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा उपआयुक्त डॉ. राजकुमार पडिले, सहा. आयुक्त डॉ. राघवेंद्र पडगलवार, गटविकास अधिकारी सुमित जाधव, अधीक्षक सौ. अनिता अलगुले, कार्यकारी अभियंता लक्ष्मण देवकर यांच्यासह अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पशुपालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. कराड म्हणाले की, शासन पशुधन वाढीसाठी प्रयत्नशील असून रेणापूरमध्ये उभारलेली ही सुसज्ज इमारत पशुधनाच्या समस्या तातडीने सोडविण्यास उपयुक्त ठरेल. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचे प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांनी सादर करावेत; त्यांना मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून मंजुरी व निधी मिळवून देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना शासन योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा, असे आवाहन करत त्यांनी रेणापूर तालुक्यातील कर्तृत्ववान कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक अनिता अलगुले यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच खरोळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. राजकुमार पडिले यांनी प्रास्ताविकातून चिकित्सालयाची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. गणेश निटुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले.

Post a Comment

0 Comments