Type Here to Get Search Results !

No title

 उदगीर तालुक्यातील गुरधाळ तलावात १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू



उदगीर ( श्रीधर जाधव) – उदगीर तालुक्यातील गुरधाळ येथील तलावात १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवार, दि. ३ मार्च रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मल्लापूर गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्लापूर येथील सावन बाबू चव्हाण (वय १७) हा युवक रंगपंचमीचा उत्सव साजरा केल्यानंतर मित्रांसोबत अंघोळ करण्यासाठी गुरधाळ तलावाकडे गेला होता. रंगपंचमी खेळल्यानंतर अंगावरील रंग धुण्यासाठी तो तलावात उतरला. मात्र पाण्याची खोली व प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने तो पाण्यात खोल भागात गेला आणि बुडू लागला.

सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, रंगपंचमीच्या आनंदाच्या वातावरणात ही दुर्दैवी घटना घडल्याने मल्लापूर गावात शोककळा पसरली आहे. सावन हा कुटुंबातील लाडका मुलगा असल्याने त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी शोक व्यक्त करत कुटुंबियांना धीर दिला.

स्थानिक नागरिकांनी तलाव परिसरात सुरक्षेची योग्य उपाययोजना करावी, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments