उदगीर तालुक्यात आ. संजय बनसोडे यांची जादू कायम, राष्ट्रवादीचे तीनही उमेदवार बहुमताने विजयी, भाजपचे दोन तर काँग्रेसचे ही दोन उमेदवार विजयी
उदगीर ( प्रतिनिधी ) उदगीर विधानसभा मतदारसंघातील उदगीर तालुक्यात असलेल्या सात जिल्हा परिषद गटामध्ये विद्यमान आमदार संजय बनसोडे यांनी जीवाचे रान करून सात पैकी पाच जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीला विजय मिळवून दिला आहे. मोठ्या जिद्दीने लढत देत काँग्रेसने ही दोन जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीमध्ये उदगीर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चुकीचे उमेदवार दिल्याचा जो आरोप होत होता, त्या आरोपाचा फटका भाजपला बसलेला आहे. इतकेच नाही तर एकूण भाजपची पकड पूर्णपणे ढिल्ली झाली आहे. याला भारतीय जनता पक्षाचे नेतेमंडळीच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असते, तरीदेखील विद्यमान आमदार संजय बनसोडे यांनी ही निवडणूक जणू आपली स्वतःची आहे, असे समजून मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती गट आणि गणामध्ये सभा घेऊन, पदयात्रा काढून, मतदारांच्या गाठीभेटी करून महायुतीचे वर्चस्व कायम टिकवुन ठेवण्यामध्ये यश मिळवले आहे.
काँग्रेससाठी दिवाळी लागणारा पराभव हा वाढवणा जिल्हा परिषद गटातील ठरणार आहे. या गटामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ तिरुके हे 8268 मते घेऊन विजयी झाले आहेत, त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नागोराव चिमनदरे 7988 मते घेऊन निसटता पराभव सहन केला आहे. भाजपचे नेते रामभाऊ तिरुके पराभूत व्हावेत त्यासाठी भाजपच्या काही लोकांनी हस्ते परहस्ते काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केल्याची चर्चा चालू होती.
मात्र दैव बलवत्तर म्हणून रामभाऊ तिरुके विजयी झाले आहेत.
सोमनाथपूर जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले आहे. भाजपच्या उमेदवार भुजबळे उषा यमुनाजी यांनी 8832 मते मिळवत विजय खेचून आणला आहे. काँग्रेसच्या तोंडारे जयश्री मनोहर यांना 5328 मते मिळाले आहेत. नळगीर जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस पक्षाच्या गायकवाड रूपाली प्रशांत यांनी 5867 मते घेऊन विजय संपादन केला आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या आंबेगावे साधना बाबुराव यांना 5007 मते मिळाली, तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
निडेबन जिल्हा परिषद गटामध्ये डॉक्टर दीपक संग्राम सोमवंशी यांनी 9268 मते घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे पाटील रणजीत मल्हारी यांना 4846 मतावर समाधान मानावे लागले.
लोहारा जिल्हा परिषद गटात आपल्यावर अन्याय झाला म्हणून महायुतीचे सक्रिय कार्यकर्ते असलेले भालेराव मुकेश भिवाजी यांनी ऐनवेळी काँग्रेसचा हात हातात धरला आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात ते उभा राहिले. त्यांनी 8102 मते मिळवून आपले प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार कांबळे विजयकुमार केरबा यांच्या विरुद्ध विजय खेचून आणला. विजयकुमार कांबळे यांना 5389 मते मिळाली. हेर जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मटके दिलीप कुमार मारुती यांनी 9067 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे सूर्यवंशी अविनाश सोपान यांना केवळ 3241 मतावर समाधान मानावे लागले. या ठिकाणी काँग्रेस पक्षाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
तोगरी जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बिरादार ज्ञानेश्वर हरिभाऊ यांनी 9601 मते मिळवून विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे शिवाजी ज्ञानोबा मुळे यांना 7546 मतावर समाधान मानावे लागले.
पंचायत समिती गणातून हंडरगुळी येथून भारतीय जनता पक्षाचे भोसले बापूसाहेब उद्धवराव यांनी 4722 मते घेऊन विजय मिळवला त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे माने माधव बाबुराव यांना केवळ 3215 मते मिळाली.
वाढवणा पंचायत समिती गणातून बंडखोर उमेदवार सुरेखा सर्जेराव भांगे पाटील यांनी 2552 मते घेऊन विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अपक्ष उमेदवार शेख नेहा रउफ यांना 2186 मते मिळाली तर भारतीय जनता पक्षाला तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. गुडसूर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वनमाला तात्यारेड्डी मरलापल्ले यांनी 3405 मध्ये घेऊन विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस पक्षाच्या गोणसे सुनीता राहुल यांना 2171 मते मिळाली.
सोमनाथपूर पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाच्या बिरादार सरमंगला मनोहर यांनी 4447 मते घेऊन विजय मिळवला. प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस पक्षाच्या हैबतपुरे छायाबाई बालाजी यांना 2451 मते मिळाली. नळगीर पंचायत समिती गणातून नादरगे धनराज धर्मपाल यांनी 2916 मते घेऊन विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार गाताटे विलास घाळप्पा 2750 मते मिळाली. नागलगाव पंचायत समिती गणातून केवढे शिल्पा शक्ती या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार 3146 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार वाघे सुप्रिया संतोष यांना 2439 मतावर समाधान मानावे लागले.
शिरूर जानापुर पंचायत समिती मनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राठोड सुनीता प्रकाश यांनी 4472 मते घेऊन विजय मिळवला. प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस पक्षाचे आडे कृष्णा वामन यांचा पराभव केला. आडे यांना 2842 मतावर समाधान मानावे लागले.
निडेबन पंचायत समिती गणातून चिखले विमल भिवाजी यांनी 4691 मते घेऊन विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी कोयले मनीषा संदीप यांना केवळ 1935 मतदान मिळाले.
लोहारा पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाचे जाधव भास्कर मधुकर यांनी 3816 मते मिळवून विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार रकसाळे बालाजी संग्राम यांना केवळ 2168 मतदान झाले. कुमठा खुर्द पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार अंधारे बालाजी केरबा यांनी 3691 मतदान घेऊन विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाचे रणक्षेत्रे रामकिशन गोरख यांना केवळ 2637 मते मिळाली.
हेर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोनकांबळे काशीबाई बळीराम यांनी 2789 मते मिळवून विजय मिळवला. प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या कसबे रेखा रणजीत यांना 1949 मतावर समाधान मानावे लागले.
देवर्जन पंचायत समिती गणातून अपक्ष कांबळे चंद्रकांत गोविंद यांनी तीन 3653 मते घेऊन काँग्रेसचे गिलचे अमोल अशोक(1878) यांचा दणदणीत पराभव केला. दावणगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुले कोमल कमलाकर यांनी 5370 मते घेऊन विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी खटके सुनिता चंद्रप्रकाश यांना 3570 मतावर समाधान मानावे लागले.
तोगरी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बिरादार प्रकाश नागेंद्र यांनी 3737 मते घेऊन दणदणीत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे पाटील शिवपुत्र राजकुमार यांना 3282 मते तर शिवसेनेचे बिरादार शिवाजी बालाजी यांना 1235 मतावर समाधान मानावे लागले.

Post a Comment
0 Comments