Type Here to Get Search Results !

मातोश्री पापड उद्योगाला महाराष्ट्र बिजनेस आयकॉन पुरस्कार प्रदान

 मातोश्री पापड उद्योगाला महाराष्ट्र बिजनेस आयकॉन पुरस्कार प्रदान 



लातूर (एल पी उगीले) लातूर येथील मातोश्री पापड उद्योग समूहाला नाशिक येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते महाराष्ट्र बिजनेस आयकॉन अवॉर्ड हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लातूर जिल्ह्याचे सुपुत्र धीरजकुमार भनगिरे आणि त्यांच्या मातोश्री सौ. आयोध्या पांडुरंग भनगिरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन स्वतःची जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण करून धीरजकुमार यांनी एक आदर्श व्यक्तिमत्व घडवून दाखवले आहे. मार्केटिंग विषयांमध्ये तज्ञ झाल्यानंतर लॉजिस्टिक क्षेत्रात काही काळ नोकरी केली, मात्र स्वतःचे काहीतरी वेगळे करण्याची ओढ त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे तो उद्योग क्षेत्राकडे वळला, आणि त्याने मातोश्री पापड उद्योग सुरू केला. 

गुजरात, राजस्थान अशा राज्यातून आपल्या भागामध्ये पापडांचे भरपूर प्रमाणात आयात असल्याचे त्याच्या लक्षात आले. अशा प्रकारच्या उद्योग व्यवसायात आपण रस घ्यावा, आपल्या भागातील लोक कमी पडत असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर आईच्या घरगुती पापड बनवण्याच्या व्यवसायाला त्यांनी व्यावसायिक रूप देण्याचे ठरवले. सन 2018 मध्ये मातोश्री फूड्स अँड स्पायसेस ची मुहूर्तमेड रोवली. आज हा ब्रँड आधुनिक तंत्रज्ञान आणि अस्सल पारंपरिक चवीचे एक समीकरण बनत चालला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनाचा विस्तार करत भेसळ न करता एकदम शुद्ध दर्जाचे उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचवत त्यांनी स्वतःचा वेगळा ग्राहक वर्ग निर्माण केला आहे. 

मातोश्री पापड मोठ्या स्तरावर विस्तारले गेले आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या मदतीने उत्पादनाचे क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. यंत्राच्या साह्याने उत्पादन करताना पदार्थांची घरची अस्सल चव जपण्यात धीरजकुमार यांनी मेहनत घेतली आहे. ग्राहकाच्या आवडीचे उडीद पापड, नाचणी पापड, तांदूळ पापड, पोहे पापड, उपवासाचे पापड, शेवई, कुरडई आणि बाजरीची खारुडी असे विविध पारंपारिक आणि वाळवण्याच्या पदार्थांना त्यांनी एका छताखाली ग्राहकांना उपलब्ध करून दिले असल्याने, लातूर जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण देशभर त्यांच्या उत्पादनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. एका छोट्याशा घरगुती व्यवसायाला मोठ्या उंचीवर नेऊन महिला सबलीकरण आणि रोजगार निर्मितीला त्यांनी हातभार लावला आहे. धीरज कुमार भनगिरे यांच्या यशाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेऊन रिसीव इन यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात मराठी चित्रपट सृष्टीतील दिगज अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते नाशिक येथे महाराष्ट्र बिजनेस आयकॉन अवॉर्ड 2025 हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच लातूर कृषी विभागाने या उद्योगास प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमार्फत चालना दिली गेली असल्याने हा पापड उद्योग लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकारचे पापड उत्पादित करणारे पहिले आणि सर्वात मोठे युनिट बनले आहे. या पुरस्काराचे श्रेय धीरजकुमार यांनी त्यांच्या मातोश्रीला आणि कुटुंबाला दिले आहे. त्यांचा हा प्रवास अनेक तरुण उद्योजकासाठी प्रेरणादायी ठरणार आहे .

Post a Comment

0 Comments