उदगीर (एल. पी. उगिले) – उदगीर विधानसभा मतदारसंघातील उदगीर तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार संजय बनसोडे यांनी आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. सातपैकी पाच जिल्हा परिषद गटांमध्ये महायुतीला विजय मिळवून देत त्यांनी तालुक्यावर आपली पकड कायम राखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार बहुमताने विजयी झाले असून भाजपचे दोन आणि काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जात असल्या, तरी आमदार संजय बनसोडे यांनी ही निवडणूक जणू स्वतःची असल्याप्रमाणे लढवली. प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि गावागावात सभा, पदयात्रा, मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी महायुतीचे वर्चस्व टिकवून ठेवण्यात यश मिळवले.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चुकीचे उमेदवार दिल्याचा आरोप जोर धरून होता. त्याचा थेट फटका भाजपला बसल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. भाजपची संघटनात्मक पकड ढिल्ली झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, याला भाजपच्या स्थानिक नेतेमंडळींचीच धोरणे कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.काँग्रेस पक्षाने मात्र मोठ्या जिद्दीने लढत देत दोन जिल्हा परिषद गटांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. वाढवणा जिल्हा परिषद गटातील निकाल हा काँग्रेससाठी अत्यंत चुरशीचा ठरला. या गटात भाजपचे रामभाऊ तिरुके यांनी 8268 मते घेत विजय मिळवला, तर काँग्रेसचे नागोराव चिमनदरे यांना 7988 मते मिळाली. भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला मदत झाल्याची चर्चा असतानाही दैव बलवत्तर ठरले आणि रामभाऊ तिरुके विजयी झाले.सोमनाथपूर जिल्हा परिषद गटात भाजपच्या भुजबळे उषा यमुनाजी यांनी 8832 मते घेत विजय मिळवला. काँग्रेसच्या तोंडारे जयश्री मनोहर यांना 5328 मते मिळाली. नळगीर जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या गायकवाड रूपाली प्रशांत यांनी 5867 मते घेत विजय संपादन केला, तर शिवसेनेच्या आंबेगावे साधना बाबुराव यांचा पराभव झाला.निडेबन जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. दीपक संग्राम सोमवंशी यांनी 9268 मते घेत दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचे पाटील रणजीत मल्हारी यांना केवळ 4846 मते मिळाली. लोहारा जिल्हा परिषद गटात बंडखोर उमेदवार भालेराव मुकेश भिवाजी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर 8102 मते मिळवत भाजपच्या कांबळे विजयकुमार केरबा यांचा पराभव केला.हेर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे मटके दिलीपकुमार मारुती यांनी 9067 मते घेत विजय मिळवला, तर तोगरी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे बिरादार ज्ञानेश्वर हरिभाऊ यांनी 9601 मते घेत विजय संपादन केला.पंचायत समिती निवडणुकांमध्येही महायुती व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले. हंडरगुळी, सोमनाथपूर, गुडसूर, शिरूर जानापुर, निडेबन, हेर, दावणगाव, तोगरी आदी गणांमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांनी विजय मिळवला. काही ठिकाणी बंडखोर व अपक्ष उमेदवारांनीही मोठे धक्के दिले.एकूणच उदगीर तालुक्यातील या निकालांनी आमदार संजय बनसोडे यांची राजकीय जादू कायम असल्याचे सिद्ध झाले असून, आगामी काळात तालुक्यातील राजकारणावर या निकालांचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment
0 Comments