Type Here to Get Search Results !

उदगीरमध्ये ‘सावकारी रॅकेट’वर प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राईक

 उदगीरमध्ये ‘सावकारी रॅकेट’वर प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राईक

एकाच दिवशी तीन ठिकाणी धाड; कोरे चेक, कोरे बाँडसह संशयास्पद कागदपत्रांचा साठा जप्त



उदगीर, (श्रीधर सावळे )

उदगीर शहरात अवैध सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा देणारी मोठी कारवाई सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने केली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी शहरातील तीन ठिकाणी धाड टाकत कोरे चेक, कोरे बाँड, हमीपत्रे तसेच मोठ्या प्रमाणावर संशयास्पद कागदपत्रांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अवैध पद्धतीने जादा व्याजदराने कर्ज देऊन नागरिकांची आर्थिक पिळवणूक केल्याच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असल्याने सहकार विभागाने ही धडक मोहीम राबविली. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू असून, तपासानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तक्रारींवरून कारवाई

गौतम काळबा सूर्यवंशी (रा. निडेबन, ता. उदगीर), उमाकांत गणपती कांवळे (रा. गुरदाळ, ता. उदगीर), संजीवकुमार गोविंदराव सगर (रा. आनंदवाडी, ता. देवणी) व राजेंद्र गणपती कांबळे (रा. गुरदाळ, ता. उदगीर) यांच्या तक्रारींवरून ही कारवाई करण्यात आली.

या ठिकाणी झडती

सहकार विभागाच्या पथकांनी स्वयंप्रभा गणपत मोतेवाड व गणपत मोतेवाड (रा. चर्च रोड, उदगीर), काशीनाथ विश्वनाथ सोमवंशी (रा. निडेबन) तसेच पिराजी बाबुराव बालुरे (रा. येणकी-मानकी रोड) यांच्या निवासस्थानी धाड टाकून झडती घेतली. झडतीदरम्यान कोऱ्या सहीचे धनादेश (चेक), बाँड, करारनामे व इतर संशयास्पद कागदपत्रे आढळून आल्याची माहिती समोर येत आहे.

अधिकाऱ्यांचे नेतृत्व

ही कारवाई सहाय्यक निबंधक बी. एस. नांदापूरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यासाठी तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. पथकात एस. एन. शेख, बी. एस. शिंदे, पी. एम. धोंडगे, जीवन चोले, पराग देशमुख, व्ही. एम. विभुते, बी. बी. कांबळे, मदन सुवर्णकार आदी लातूर, औसा, उदगीर व शिरूर अनंतपाळ येथील सहकार अधिकाऱ्यांचा समावेश होता.

पोलीस बंदोबस्त

कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे तसेच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविला.

पुढील कारवाईची प्रक्रिया

जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची कायद्यानुसार तपासणी करून संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. अवैध सावकारीचे आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.

सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्यांना आवाहन

सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या नागरिकांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन सहाय्यक निबंधक बी. एस. नांदापूरकर यांनी केले आहे. शासनाने अवैध सावकारीविरोधात कडक कायदे केले असून, अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास थेट सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, उदगीर येथे संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

कायद्यातील प्रमुख तरतुदी

महाराष्ट्रात सावकारी (खाजगी कर्जव्यवहार) नियंत्रित करण्यासाठी कायदा लागू असून त्यानुसार –

सावकारी व्यवसायासाठी शासनाकडून वैध परवाना आवश्यक आहे.

शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जादा व्याज आकारणे बेकायदेशीर आहे.

कर्ज व्यवहारांची स्पष्ट नोंद, पावत्या व हिशेब ठेवणे बंधनकारक आहे.

कर्जदारांकडून कोऱ्या सहीचे चेक, बाँड किंवा हमीपत्र घेणे हा गुन्हा ठरू शकतो.

तालुक्यातील अवैध सावकारीविरोधातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, यामुळे बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments