Type Here to Get Search Results !

नीतीमान व्यक्ती समाजाला दिशा देतात : रो. डॉ.हरिप्रसाद सोमाणी

 नीतीमान व्यक्ती समाजाला दिशा देतात : रो. डॉ.हरिप्रसाद सोमाणी 



रोटरी क्लबच्या उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्काराचे उदगीरात थाटात वितरण 

उदगीर : समाजात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असतात. त्या समस्या सोडवून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम नीतीमान व्यक्ती करीत असतात, असे प्रतिपादन रोटरी क्लब 3132 चे माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी यांनी केले. 

रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्काराचे सोमवारी (दि. 23 रोजी ) रोटरी क्लब 3132 चे माजी प्रांतपाल डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांच्या हस्ते येथील मोरया मंगल कार्यालयात वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे होते. व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव विक्रम हलकीकर यांची उपस्थिती होती. 

यावेळी रोटरी क्लबच्या वतीने शहरातील ज्येष्ठ व्यापारी बाळकृष्ण मुक्कावार यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. उदगीरचे भूमिपुत्र नांदेड येथील प्रसिद्ध पचनसंस्था विकार तज्ञ् डॉ. नितीन जोशी, हैद्राबाद येथील उद्योजक असलेले उदगीरचेच भूमिपुत्र मारोती मरलापल्ले,ज्येष्ठ व्यापारी ईश्वरप्रसाद बाहेती, शिवकुमार डोईजोडे, दत्तात्रय भोसले यांचा उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

पुढे बोलताना डॉ.हरिप्रसाद सोमाणी म्हणाले की, समाजात कोणताही व्यवसाय हा कमी दर्जाचा नसतो. त्या त्या व्यवसायात काम करणारी व्यक्ती त्या व्यवसायाला मोठा दर्जा मिळवून देत असते असे सांगत सोमाणी यांनी रोटरी क्लब हे नीतीमानता जोपासून काम करणारी संस्था असल्याचे सांगितले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. नितीन जोशी यांनी उदगीरच्या मातृभूमीत झालेल्या सत्काराने आपण भारावून गेलो असून या सत्काराने मला आणखी नव्या जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे ते म्हणाले. अलीकडच्या काळात देशात मानसिक आरोग्य ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून झोप येण्यासाठी गोळ्या घेणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. हे देशासाठी घातक असल्याचे सांगत डॉ. जोशी यांनी मानसिक आरोग्याच्या विषयावर जनजागृती होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. 

अध्यक्षीय समारोपात राजेश्वर निटुरे यांनी रोटरी क्लबचे कार्य हे कौतुकास्पद असून समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्ती शोधून त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. 

उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी रोटरी क्लबने समाजातील शेवटच्या घटकासाठी नेहमीच काम केले असल्याचे सांगितले. 

या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबचा 121 वर्धापनदिन केक कापून साजरा करण्यात आला.

प्रारंभी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल जैन यांनी केले. प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. जीवन गौरव सन्मानपत्राचे वाचन ज्योती स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन मंगला विश्वनाथे व विशाल तोंडचिरकर यांनी केले. आभार मोतीलाल डोईजोडे यांनी मानले. कार्यक्रमास समाजातील विविध क्षेत्रातील नागरिक, महिला पुरुष, रोटरी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments