लातूर पोलीसांचे विशेष पथक सक्रिय; १७ वर्षांपूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद.
लातूर (एल पी उगीले) पोलीस दलाकडून प्रलंबित व डारमंड फाईलमध्ये वर्ग करण्यात आलेल्या जुन्या गुन्ह्यांचा सातत्याने आढावा घेऊन, आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर गु.र.नं. १३३/०९ कलम ३७९, २०१ भा.दं.वि. मधील तब्बल १७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस लातूर पोलीसांच्या विशेष पथकास अटक करण्यात यश मिळविले आहे.
सदर गुन्ह्यातील फिर्यादीची हिरो होंडा प्लस मोटारसायकल चोरीस गेली होती. त्यावरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गु.र.नं. १३३/०९ कलम ३७९ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी व दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. तिघांना ताब्यात घेण्यात आले होते.
त्यावेळी आरोपी नामे सिध्देश्वर ऊर्फ दत्ता शिवाजी घोगरे (वय ३७ वर्षे, रा. शिवनगर, लातूर, सध्या ह.मु. मंत्रीनगर, लातूर) यास दि. १५/०६/२००९ रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तो सतत अनुपस्थित राहत असल्याने प्रकरण सुप्त संचिकेत वर्ग करण्यात आले होते. सदर आरोपीने गेल्या १७ वर्षांपासून वास्तव्याचे ठिकाण वारंवार बदलून प्रशासनास गुंगारा दिला होता. अलीकडेच आरोपी लातूर शहरात असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकास प्राप्त झाली. त्यानुसार वरिष्ठांना कळवून तात्काळ सापळा रचून आरोपीस सिध्देश्वर चौक, मळवटी रिंगरोड, लातूर येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे हजर करण्यात आले.आरोपीस मुख्य न्यायदंडाधिकारी सतिश एन. पाटील यांनी दि. १८/०२/२०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
लातूर पोलीस दलाकडून यापूर्वीही अशा प्रकारे डारमंड फाईलमधील जुने व प्रलंबित गुन्हे पुनरुज्जीवित करून फरार आरोपींना अटक करण्याची प्रभावी मोहीम राबविण्यात आलेली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे व योगेश गायकवाड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Post a Comment
0 Comments