नांदेड जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांना महसूली गावाचा दर्जा; ‘तांड्यांचा प्रवास समृद्धीच्या दिशेने’ कार्यशाळा संपन्न
उपशीर्षक :
24 तांड्यांना आधीच दर्जा; आठ दिवसांत 125 प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
नांदेड, दि. 12 फेब्रुवारी :
बंजारा व लमाण तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 24 तांड्यांना यापूर्वीच महसूली गावांचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आणखी 125 बंजारा/लमाण तांड्यांना महसूली गावाचा दर्जा देण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या पुढाकारातून प्रगतीपथावर आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे ‘तांड्यांचा प्रवास समृद्धीच्या दिशेने’ या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या योजनेकडे विशेष लक्ष केंद्रीत केले असून संबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना सातत्याने कार्यप्रवण करून प्रक्रियेला गती देण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आयोजित कार्यशाळेत तांड्यांचे प्रस्ताव सादर करण्यापासून ते स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. येत्या आठ दिवसांत 125 तांड्यांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, तहसीलदार विपीन पाटील, आनंद रहाटीकर, समन्वय अधिकारी उषा कदम तसेच विविध तालुक्यांतील नायब तहसीलदार, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्राम विकास अधिकारी असे 300 हून अधिक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
तांड्यांचे महसूली गावात रूपांतराचे फायदे :
▪ रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनासह मूलभूत सुविधांची उपलब्धता
▪ लोकसंख्येचा निकष पूर्ण झाल्यास स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन
▪ विविध शासकीय योजनांतर्गत निधीची वाढीव उपलब्धता
महसूली गावाचा दर्जा मिळाल्यामुळे तांड्यांच्या विकासाला नवे बळ मिळणार असून समृद्धीकडे वाटचाल अधिक वेगाने होणार आहे.

Post a Comment
0 Comments