*मराठी शाळांच्या* *संरक्षणासाठी शिवसंग्राम संघटनेतर्फे बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांचा जाहीर निषेध*
मराठी शाळा वाचवण्यासाठी बसवकल्याणात भव्य मोटारसायकल रॅली; मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांना निवेदन
बिदर / प्रतिनिधी :
बेळगाव येथे पार पडलेल्या २०२५ च्या हिवाळी अधिवेशनात मराठी शाळा रद्द करण्याची मागणी करणारे वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांच्याविरोधात शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बुधवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी बसवकल्याण येथे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे बसवकल्याणचे तहसीलदार यांच्यामार्फत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या, विधानसभा सभापती, शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा तसेच शिक्षण उपायुक्त, बिदर यांना निवेदन सादर करून आमदार शरणू सलगर यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
शिवसंग्राम संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२५ च्या बेळगाव हिवाळी अधिवेशनात आमदार शरणू सलगर यांनी “मराठी शाळा बंद कराव्यात” असे केलेले विधान अत्यंत दुर्दैवी, अपमानजनक व मराठी भाषिकांच्या भावना दुखावणारे आहे. बसवकल्याण हा सीमावर्ती तालुका असून येथे मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक जनता वास्तव्यास आहे. अशा परिस्थितीत मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याची मागणी करणे म्हणजे सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर घाला घालण्यासारखे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, मराठी शाळा बंद करण्याऐवजी त्यांना संरक्षण देणे, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शाळांचा दर्जा उंचावणे ही शासनाची जबाबदारी आहे. सीमावर्ती भागात कन्नड माध्यमाच्या शाळांबरोबरच मराठी माध्यमाच्या शाळाही तितक्याच आवश्यक असून, दोन्ही भाषांचा सन्मान राखणे ही लोकशाही मूल्यांची गरज असल्याचे शिवसंग्राम संघटनेने ठामपणे मांडले.
मोटारसायकल रॅलीदरम्यान आंदोलकांनी “मराठी शाळा वाचल्या पाहिजेत”, “सीमाभागातील मराठी शिक्षणाला न्याय द्या”, “मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आमदार सलगर यांनी मराठी शाळांऐवजी केवळ कन्नड माध्यमाच्या शाळा ठेवाव्यात असे केलेल्या विधानामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
यावेळी वक्त्यांनी आमदार शरणू सलगर यांना थेट इशारा देत सांगितले की, मराठी शाळा बंद करण्याबाबत केलेले विधान त्यांनी तात्काळ मागे घ्यावे. अन्यथा मराठी भाषिक जनतेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांवर राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
वक्त्यांनी पुढे सांगितले की मराठी शाळांमध्ये कन्नड भाषा ही द्वितीय भाषा म्हणून शिकवली जाते. बेळगाव, बिदर, औराद, भालकी, बसवकल्याण, कमलनगर आदी भागांतील सुमारे ८६५ गावांमधील मराठी भाषिक विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन आज शासकीय, निमशासकीय, सॉफ्टवेअर इंजिनिअर तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यामुळे मराठी शाळा बंद करण्याचे विधान म्हणजे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालणारे असल्याचे आंदोलकांनी ठामपणे नमूद केले.
या मोर्चाचे नेतृत्व बिदर जिल्हा शिवसंग्रामचे अध्यक्ष संदीप तेलगावकर आणि बसवकल्याण तालुका शिवसंग्रामचे अध्यक्ष संतोष बिरादार यांनी केले. यावेळी संभाजी जगताप, सदानंद बिरादार, सचिन खेळगे, वेंकटेश दत्ता, संतोष गायकवाड, सुरेश पाटील, विक्रम पाटील, संदीप बिरादार, बालाजी पाटील, विजयकुमार पाटील, सतीश कटारे यांच्यासह बसवकल्याण परिसरातील मोठ्या संख्येने मराठी भाषिक नागरिक उपस्थित होते.
शिवसंग्राम संघटनेने शेवटी स्पष्ट इशारा दिला की मराठी भाषा, संस्कृती व शिक्षणावर होणारा कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही. मराठी शाळांच्या संरक्षणासाठी व मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी भविष्यातही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment
0 Comments