*दर्पणरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने ‘सीमावार्ता टाइम्स’चे संपादक राम जाधव यांचा गौरव*
बुलढाणा / मलकापूर :
महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र समूह आणि आंतरराष्ट्रीय मानांकन ISO 9001:2015 प्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त दर्पणरत्न राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि दर्पण पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या राज्यस्तरीय सोहळ्यात उदगीर तालुक्यातील व सीमाभागातील मराठी भाषिकांचा गेल्या १२ वर्षांपासून निर्भीड आवाज बुलंद करणारे ‘सीमावार्ता टाइम्स’ या वृत्तपत्राचे संपादक राम जाधव यांना त्यांच्या उल्लेखनीय, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेसाठी दि. ६ जानेवारी २०२६ रोजी मराठा मंगल कार्यालय, मलकापूर (ता. बुलढाणा) येथे दर्पणरत्न राज्यस्तरीय व्हीआयपी मोड पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
आपत्तीच्या काळात लोकहितासाठी पत्रकारिता
सप्टेंबर २०२५ मध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे कर्नाटकातील नदी-नाले व तलाव ओसंडून वाहिले. बोरगाव बु. नदीला धडकनाळ नदीला आलेल्या भीषण पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून वाहून गेल्या. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्याची नासधूस झाली, घरे मोडकळीस आली, जनावरे वाहून गेली तसेच रस्ते व वीजपुरवठा खंडित झाला.
या भीषण आपत्तीच्या काळात संपादक राम जाधव यांनी विविध वृत्तपत्रांतून सातत्याने वृत्तांकन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. विशेषतः ‘सीमावार्ता टाइम्स – आसवाचा महापुर २०२५’ हा विशेषांक प्रकाशित करून पूरग्रस्तांच्या वेदना समाजासह शासन-प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः गावकऱ्यांना सोबत घेऊन मा. पालकमंत्री तसेच मा. जिल्हाधिकारी, लातूर यांना निवेदन देऊन तातडीच्या मदतीची मागणी केली. विविध सामाजिक संस्थांशी संपर्क साधून पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य किट वाटपासाठीही त्यांनी पुढाकार घेतला.
सामाजिक बांधिलकीची दखल
राम जाधव यांच्या या निर्भीड, लोकहितकारी व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेची दखल घेत हिंदी मराठी पत्रकार संघाने त्यांना दर्पणरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले.
या पुरस्कार
सोहळ्यास निलेश दायडे (सह आयुक्त, मुंबई), शाताभाई वानखेडे, प्रा. अनिल खर्चे, सुहास चवरे (प्रसिद्ध उद्योगपती), हिंदी मराठी पत्रकार संघाच्या धनुश्री पाटील, बाबासाहेब दामोदर (शेतकरी नेते), चंद्रकांत वर्मा, किशोर सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार पूरग्रस्तांना समर्पित
पुरस्कार स्वीकारताना संपादक राम जाधव यांनी, “हा सन्मान माझा नसून पूरग्रस्त शेतकरी, कष्टकरी व सामान्य नागरिकांचा आहे,” अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या या सन्मानाबद्दल बोरगाव बु. येथील ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments