Type Here to Get Search Results !

मलकापूर येथे अलका तानाजी सोनवणे यांना दर्पण रत्न पुरस्काराने सन्मानित

 मलकापूर येथे अलका तानाजी सोनवणे यांना दर्पण रत्न पुरस्काराने सन्मानित



 बुलढाणा मलकापूर (प्रतिनिधी )

मराठी पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पण रत्न पुरस्कार २०२६ वितरण समारंभ मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात जळगाव येथील पोलीस क्राईम रिपोर्टर, बारा बलुतेदार महिला सचिव तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगावच्या सक्रिय कार्यकर्त्या अलका तानाजी सोनवणे यांना त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेऊन दर्पण रत्न पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001:2015 प्रमाणित हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या ९८० प्रस्तावांपैकी २४० मान्यवरांची निवड करून त्यांना दर्पण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी निलेश तायडे, सहायक माहिती आयुक्त, मंत्रालय मुंबई हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रा. अनिल खर्चे (प्राचार्य, व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज) यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून अशांतभाई वानखेडे (संस्थापक, समतेचे निळे वादळ), धनश्रीताई काटीकर पाटील (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, हिंदी मराठी पत्रकार संघ), बंडूभाऊ चवरे व बाळासाहेब दामोदर (उद्योजक), दामोदर शर्मा (शेतकरी नेते), विजय डागा, बंडू चौधरी, सुभेदार दिनेश तायडे (कारगिल योद्धा), चंद्रकांत वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, उद्योजक, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा दर्पण रत्न पुरस्कार २०२६ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देशसेवेसाठी उल्लेखनीय योगदान देणारे व कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी सैनिक सुभेदार दिनेश तायडे यांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments