Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 सर्व राजकीय पक्ष, उमेदवार यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन

 जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026


सर्व राजकीय पक्ष, उमेदवार यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन



* जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक 


लातूर, दि. 17 : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे सर्व राजकीय पक्ष, उमेदवार यांनी पालन करणे आवश्यक आहे. या नियमांबाबत राजकीय पक्षांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना, उमेदवारांना माहिती द्यावी. या नियमांचे पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततामय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केले.


लातूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 10 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके अविनाश कोरडे, सुशांत शिंदे, मंजुषा लटपटे, रोहिणी नऱ्हे-विरोळे, संदीप कुलकर्णी, गणेश पवार, अहिल्या गाठाळ, संगीता टकले, स्वाती दाभाडे यांच्यासह आदर्श आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, निवडणूक खर्च कक्षाचे नोडल अधिकारी राजेंद्र नागणे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


नामनिर्देशन पत्र भरण्यापासून ते निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विविध नियम ठरवून दिले आहेत. या नियमांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. तसेच निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासूनच जिल्हा परिषद व संबंधित पंचायत समिती क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पथके स्थापन केली आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवार यांनी आवश्यक परवानगी घेवूनच प्रचार सभा, रॅली याचे आयोजन करावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.


काही ठिकाणी नवीन मतदान केंद्र करण्यात आली असल्याने संबंधित मतदारांना याबाबत माहिती देण्यात येत आहे. तसेच दुबार मतदारांकडून घोषणापत्र भरून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रचार विषयक विविध परवानग्या देण्यासाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर कक्ष कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


राजकीय पक्ष, उमेदवार यांच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशांची, तसेच निवडणूक विषयक महत्वाच्या नियमांची माहिती यावेळी उपस्थित राजकीय पक्ष पदाधिकारी यांना देण्यात आली.

Post a Comment

0 Comments