मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तोंडचिर ग्रामपंचायतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम
१००% कर भरणाऱ्या कुटुंबांसाठी अल्प दरात दळण सुविधा – पिठगिरणीचा शुभारंभ
उदगीर तोंडचीर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तोंडचीर ग्रामपंचायतीने एक नाविन्यपूर्ण व लोककल्याणकारी उपक्रम राबवत पिठाच्या गिरणीचे उद्घाटन करून ग्रामीण जनतेसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामपंचायत कर १००% भरणाऱ्या कुटुंबांना अल्पदरात दळणाची सेवा देण्यात येणार असून गावातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
या पिठगिरणीचे उद्घाटन आज पं.स. उदगीरचे गटविकास अधिकारी मा. श्री. मेडेवार एन.एस. यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीने राबविलेला हा उपक्रम जनतेच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कर भरण्यामध्ये शंभर टक्के कामगिरी करणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.” त्यांनी गावाच्या विकासात नागरिकांनी सक्रिय सहभाग ठेवावा, असेही आवाहन केले.
सरपंचांनीही ग्रामपंचायतीच्या वतीने सांगितले की, “गावातील सर्वसामान्य कुटुंबांचा आर्थिक भार हलका करण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे. कर भरणाऱ्या कुटुंबांचा गौरव करण्याचा हा उपक्रम असून पुढील काळातही ग्रामपंचायत अशा विविध लोकहिताच्या योजना राबवणार आहे.”
या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना बाजारपेठेपर्यंत जाण्याची गरज कमी होणार असून वेळ व आर्थिक बचत होणार आहे. गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.


Post a Comment
0 Comments