संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष बळवंत चिंचोलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
उदगीर : सक्सेस पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्थेमध्ये भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यानंतर, उदगीर लॅब असोसिएशनचे अध्यक्ष व संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. बळवंत चिंचोलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या प्रसंगी माजी सैनिक रामराव कांबळे, संस्थेचे अध्यक्ष बशीर शेख, प्राचार्य, शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर श्री. बळवंत चिंचोलकर यांनी संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करताना सांगितले की, सक्सेस पॅरामेडिकलच्या २०२४-२५ च्या तुकडीतील सर्व विद्यार्थी शंभर टक्के उत्तीर्ण झाले असून हे यश संस्थेच्या अध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचे फलित आहे.
या कार्यक्रमात त्यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष बक्षिसाची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
देशभक्तीपर गीते, घोषणा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसर दुमदुमून गेला. उत्साह, शिस्त आणि एकात्मतेने युक्त असा हा स्वातंत्र्य दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments