Type Here to Get Search Results !

बोगसगिरी चा प्रत्यय येतोय पुन्हा पुन्हा !! श्रद्धास्थान असलेल्या बौद्ध विहारालाही गुत्तेदाराने लावला चुना !!

बोगसगिरी चा प्रत्यय येतोय पुन्हा पुन्हा !!


श्रद्धास्थान असलेल्या बौद्ध विहारालाही गुत्तेदाराने लावला चुना 


बोगसगिरी चा प्रत्यय येतोय पुन्हा पुन्हा !!

श्रद्धास्थान असलेल्या बौद्ध विहारालाही गुत्तेदाराने लावला चुना !!


उदगीर (प्रतिनिधी) उदगीरचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय भाऊ बनसोडे यांनी मोठ्या कष्टाने कोट्यावधी रुपयाचा निधी उदगीर विधानसभा मतदारसंघासाठी खेचून आणला. मात्र या निधीचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. कदाचित तो राजकीय भाग असेल, आरोप प्रत्यारोप होत राहतात. असे म्हणून लोकांनी त्याकडे कानाडोळा केला होता. जेव्हा की कित्येक रस्त्यावर खड्ड्यांचा बाजार भरलेला आहे. कित्येक रस्ते बनवल्यानंतर काही महिन्यातच उखडून गेले आहेत. आणि शहराच्या मुख्य रस्त्यावर महापुरुषांच्या चौका चौकात चारही बाजूंनी खड्ड्यांनी आपली शोभा वाढवलेली आहे. कधी राष्ट्रीय महामार्ग म्हणून निधी आला!! तर कधी राज्यमार्ग म्हणून निधी आला!! कधी चौक सुशोभीकरणचा निधी आला!! मात्र त्याच त्या रस्त्यावर तो निधी खड्ड्यात घालण्यात आला!! असे लोक बोलू लागले आहेत. आता हा राजकारणाचा विषय नाही, मात्र जवळपास आठ नऊ वर्षांपूर्वी जेव्हा तो सिमेंट रस्ता अत्यंत मजबूत झाला होता, तेव्हा या चौकात आलेल्या निधीसाठी म्हणून त्याच रस्त्यावर फेवर ब्लॉक बसवण्यात आले. नंतर पुन्हा निधी आला म्हणून त्याच फेवर ब्लॉक वर पुन्हा डांबरीकरणाचा रस्ता झाला. पाऊस आला की निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाला बाजूला सारून आतून या निकृष्ट कामाची चुगली करण्यासाठी फेवर ब्लॉक डोकावून पाहतात, उदगीरच्या षंढ प्रवृत्तीच्या आंदोलक लोकांना जणू हे खड्डे चिडवतात की काय? असे म्हटले तर वावगे होऊ नये.

किमान जी श्रद्धास्थाने आहेत, त्या ठिकाणी तरी कमीत कमी प्रामाणिक पणे काम होणे अपेक्षित असते, मात्र दुर्दैवाने तेच ते गुत्तेदार आणि तोच तो निकृष्ट दर्जा!!

असा प्रत्येय पाऊलो पावली येतो आहे. इतके दिवस लोकही गप्प होते. मात्र आता बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या आणि उदगीरसाठी एक प्रेक्षणीय स्थळ बनलेल्या बौद्ध विहारला दिलेला रंग उडून जातो आहे. परवा झालेल्या पावसामुळे बौद्ध विहार गळू लागलेले आहे. जणू काही या बोगस कामाला पाहून बौद्ध विहाराच्या डोळ्यातून अश्रू टप्पू लागले आहेत. इतका सारा बोगसपणा लक्षात येताच, लोकांनी ओरड सुरू केली, तितक्याच तातडीने गुत्तेदारांनी सावध होऊन पुन्हा वॉटरप्रूफिंग चे काम सुरू केले आहे! हा प्रकार म्हणजे लोकप्रतिनिधीच्या नावलौकिकाला काळीमा फासणारा आहे. बोगसगिरी ला काही मर्यादा असाव्यात. यासंदर्भात लोकप्रतिनिधी काय म्हणतात? हे अजून स्पष्ट झाले नसले तरी, हा एकूण प्रकार निश्चितच बौद्ध समाजाच्या भावना दुखावणारा आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. किमान हे दुरुस्तीचे आणि चुना लावण्याचे काम तरी लवकरात लवकर व्हावे, दर्जेदार व्हावे अशी भाबडी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

चौकट.......

विकास उत्तू जातोय.....

भ्रष्टाचार डोकावून पाहतोय ?


उदगीर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाल्याचा गवगवा मोठ्या प्रमाणात चालू आहे. लोकांना सहज दिसतील अशा काही इमारती ही झाल्या आहेत, ते कोणी नाकारू शकत नाही. मात्र दुर्दैवाने त्या कामाचा दर्जा काय आहे? हे सर्व सामान्य माणसाला लक्षात न येणारी बाब आहे. नांदेड बिदर रस्त्याचे उदाहरण घेतल्यास विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सिमेंट रस्त्या वर बनवलेल्या फेवर ब्लॉक्स आणि त्यावर डांबरीकरण अशा रस्त्याला पडलेल्या खड्ड्यातून डोकावणारे फेवर ब्लॉग्स काय सांगतात? किंवा छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकामध्ये टकाटक असलेल्या सिमेंट रस्त्यावर बनवण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या रस्त्याची झालेली चाळण आणि आतून अत्यंत मजबूत असलेला डांबरीकरणाचा रस्ता दिसतो, हा प्रकार म्हणजे विकासासाठी आलेला निधी किती बोगसगिरीने वापरला गेला? याची चुगली करत आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. आणि आता तर कहर म्हणजे चक्क विश्वशांती बौद्ध विहाराला गळती लागली आहे! भव्य दिव्य उद्घाटन होऊन, त्याची महतीही लोक विसरले नाहीत... तोच त्या भव्यदिव्य इमारतीला आता पुन्हा रंग देण्याची वेळ यावी! आता त्या इमारतीला वॉटरप्रूफिंग करण्याची गरज वाटावी? हे वास्तुशास्त्रातील तज्ञांना पटलेली असेल कदाचित, मात्र सर्वसामान्य भाबड्या जनतेला ही गोष्ट बिलकुल आवडलेली नाही. भ्रष्ट प्रवृत्तीला काही मर्यादा असाव्यात, अशी भाबडी अपेक्षा लोक व्यक्त करू लागले आहेत. कित्येक कामे बोगस झाली, त्याबद्दल राजकारणी लोकांनी ओरड केली असेल, काही प्रसिद्धी माध्यमांनी ओरड केली असेल, मात्र सर्वसामान्य जनता गप्पच होती. मात्र जेव्हा श्रद्धेच्या ठिकाणी अशा पद्धतीने बोगसगिरी दिसायला लागते, त्यावेळेस लोकांना संताप येणे स्वाभाविक आहे. त्या संतापातूनच आता लोक उघड उघड बोलू लागले आहेत. चीड व्यक्त करू लागले आहेत. राजकारणी लोकांना याबद्दल काही वाटते की नाही माहित नाही, भावनिक लोक नाराजी व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments