Type Here to Get Search Results !

चंदर अण्णा वैजापूरे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व - स्वप्निल जाधव

 चंदर अण्णा वैजापूरे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व - स्वप्निल जाधव 



उदगीर (प्रतिनिधी) उदगीर शहरातील एक प्रतिष्ठित आणि वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंदर अण्णा उर्फ चंद्रकांत वैजापुरे हे महाराष्ट्रातील तमाम तरुणांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. अगदी शून्यातून विश्व उभा करण्याची प्रत्यक्ष अण्णांनी कृती करून दाखवली आहे. नोकरी मागत फिरणाऱ्या तरुणांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणाऱ्यांची कुवत ठेवावी, आणि त्याच जिद्दीने उद्योग उभारावेत. असा हेतू ठेवून अगदी गरिबीतून पुढे येत आज मराठवाड्यातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व तथा सहकार महर्षी म्हणून चंदर अण्णा वैजापूरे यांची ओळख निर्माण झाली आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण देखील वाटचाल करावी, अशी प्रेरणाच अप्रत्यक्षपणे अण्णांनी दिलेली आहे. अण्णाच्या सोबत राहण्याने देखील एक ऊर्जा प्राप्त होते. असे विचार युवा नेते तथा पुणे येथील साईकृपा अर्बन फायनान्स निधी लिमिटेड चे चेअरमन तथा वेंकटेश मल्टीस्टेट शाखा चालवणारे स्वप्निल अण्णा जाधव यांनी सहकार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. आपल्या डोळ्यासमोर चंदर अण्णा वैजापूरे म्हणजे सहकार क्षेत्रातील भीष्म पितामह आणि कर्मयोगी व्यक्तिमत्त्व आहे असेही उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील रहिवासी स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले आहे. 

           ते सहकार महर्षी चंदर अण्णा वैजापूरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते. पुढे बोलताना स्वप्नील अण्णा जाधव म्हणाले की, एका छोट्याशा बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम करून, अगदी सायकलवर फिरून पैसे गोळा करून, मोठ्या कष्टाने स्वतःचे विश्व उभा केले आहे. हे सर्व करत असताना आपल्या नोकरीतून त्यांनी सहकाराचे धडे घेऊन आज महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या महात्मा गांधी अर्बन को-ऑपरेटिव सोसायटी आणि उदगीर जनता को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्यामुळे महाराष्ट्र पातळीवरील सहकार चळवळीतील सहकार मंच आयोजित "प्रतिबिंब" हा पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य सहकार महासंघाच्या वतीने दिला जाणारा "दीपस्तंभ"पुरस्कार, नवचेतन प्रकाशनच्या वतीने दिला जाणारा सहकार श्रेष्ठ पुरस्कार, राज्य पातळीवरील बँक पतसंघ पुरस्कार,आणि "सहकार सुगंध"अशा अत्यंत मानाचे पुरस्कारही त्यांच्या संस्थेने प्राप्त केले आहेत.

 अण्णांनी शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच कित्येक तरुणांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवत अल्प व्याज दरात कर्जपुरवठा करून नवीन नवीन उद्योग धंदे उभा करण्याची प्रेरणा दिली आहे. चंदर अण्णाचा हा 71 वा वाढदिवस असून एखाद्या तरुणाला लाजवेल, अशी स्फूर्ती यांनी उत्साह त्यांच्या कामात दिसून येतो. आज ते गर्भ श्रीमंत असून देखील ते कसलाच अहंकार किंवा मोठेपणा मिरवत नाहीत, हेच त्यांचे खरे मोठेपण आहे. आपण गरीबीतून पुढे आलो, त्यामुळे समाजातील कोणीही गरीब व्यक्ती पुढे जात असेल तर त्याला आपल्या परीने जे जे म्हणून सहकार्य करता येईल, ते ते सहकार्य करण्याची त्यांची तळमळ निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. असे ही विचार स्वप्नील अण्णा जाधव यांनी याप्रसंगी व्यक्त केले. 

समाजातील तरुणांनी आज आपल्या समोर अशा व्यक्तिमत्त्वाचा आदर्श ठेवून काम करणे गरजेचे आहे. याच भागातील मातीत मी देखील वाढलेला आहे. माझे वडील कष्टकरी, कामगार होते, पण त्यांनी मोठ्या जिद्दीने सहकार क्षेत्र उभारले आणि आज चंदर अण्णा सारख्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी त्या क्षेत्रामध्ये भरभराट कशी आणता येईल? या दृष्टीने प्रयत्न करत आहे. असाच आदर्श इतर तरुणांनीही घ्यावा, आणि आपले जीवन सुखी बनवावे. अण्णाचा उत्साह, या वयात देखील दुचाकी वर फिरून जनसंपर्क वाढवणे, संपूर्ण मतदारसंघात राजकारणाच्या घड्या बदलण्याची क्षमता ठेवणे ही ताकत त्यांनी निर्माण केली आहे. तो आदर्श तरुणांनी डोळ्यासमोर ठेवावा. असेही याप्रसंगी स्वप्नील अण्णा जाधव यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments