नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एका नवविवाहितेचा अवघ्या १२ दिवसांत संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरोधात हुंड्यासाठी छळ आणि विष देऊन हत्या केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मृत महिलेचं नाव ताऊबाई चव्हाण (वय २२) असून तिचा विवाह २ जुलै रोजी मुखेड तालुक्यातील राठोडवाडी येथील सुधाकर राठोड याच्याशी झाला होता. ७ जुलै रोजी काही काळ माहेरी राहिल्यानंतर ती ८ जुलै रोजी पुन्हा सासरी परतली. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ जुलै रोजी सासरकडून माहेरी फोन करून सांगण्यात आलं की, तिला अचानक उलट्या होऊ लागल्या आहेत.
सुरुवातीला मुखेड येथे तिला प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आलं. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे हैदराबाद येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं. उपचार सुरू असतानाच १३ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.
विवाहितेच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, लग्नासाठी एकूण ६ लाख रुपयांचा हुंडा ठरवण्यात आला होता. त्यापैकी ५ लाख रुपये दिल्यानंतर उर्वरित १ लाख रुपयांसाठी तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. अखेर तिला विष पाजून ठार मारण्यात आलं, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासरे व आणखी एका व्यक्तीविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून, विवाहितेने स्वतः विष प्राशन केलं की तिला जबरदस्तीने विष देण्यात आलं याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिनाशकुमार यांनी दिली आहे.
ही घटना वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यात पुन्हा एकदा हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या घटनांकडे लक्ष वेधणारी ठरली आहे.
#Nanded #news #marriage #crime

Post a Comment
0 Comments