नायगाव (जि. नांदेड) – बळेगाव येथील रहिवासी बळीराम किशन बेलकर यांनी घरकुल योजनेत झालेल्या अन्यायाविरोधात प्रशासनाकडे लेखी तक्रार केली असून, योग्य चौकशी करून घरकुल आपल्या नावावर मंजूर करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा कुटुंबासमवेत अत्यंत कठीण पावले उचलावी लागतील, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
बेलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी अंबूबाई बळीराम बेलकर यांचे नाव जॉब कार्ड (क्र. MH-19-012-010-001/313) व घरकुल यादीत असूनही, ऑनलाईन नोंदणी करताना चुकून ‘अंबूबाई हाणमंत बेलकर’ असे नाव टाकण्यात आले. या चुकीमुळे घरकुल मंजुरीचा लाभ त्यांच्या पत्नीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीस मिळाला आहे.
ही चूक लक्षात येऊन ग्रामपंचायतीकडे घरकुल प्रस्ताव रिटर्न पाठवण्यात आला. मात्र, कोणतीही गावचावडी वाचन अथवा नोटीस न करता, गावातील आंबादास हाणमंत बेलकर यांच्या नावाने नव्याने सर्वे करून त्यांना घरकुल मंजूर करण्यात आले. इतकेच नव्हे तर रु. 15,000/- चा पहिला हप्ता देखील त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला.
बेलकर यांनी यावर आक्षेप घेतला असून, दुसऱ्या हप्त्यापूर्वी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि मूळ लाभार्थ्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, जर यावर वेळेत कारवाई झाली नाही, तर आपल्याला अति टोकाची भूमिका घ्यावी लागेल.या प्रकरणामुळे घरकुल योजनेतील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, प्रशासनाने त्वरीत योग्य चौकशी करून योग्य लाभार्थ्याला घरकुल मिळवून द्यावे, अशी मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments