Type Here to Get Search Results !

इतर ठिकाणच्या छोट्या-मोठ्या जुगारावर धाडी पडतात !! मैत्री कार्डरूमच्या नावाखाली तीर्र्ट जुगाराच्या मोठ्या राशी उभारतात !!

 इतर ठिकाणच्या छोट्या-मोठ्या जुगारावर धाडी पडतात !!

मैत्री कार्डरूमच्या नावाखाली तीर्र्ट जुगाराच्या मोठ्या राशी उभारतात !!



लातूर ( प्रतिनिधी) उदगीर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मैत्री कार्ड रूममध्ये अवैध धंद्याचा अक्षरशः पाऊस पडतो. तरीही पोलीस तिथे न जाता थातूरमातूर ठिकाणी कारवाई करून चमकोगिरी करत आहेत. याबद्दल जनतेमध्ये तर्क वितर्क लावले जात आहेत.

लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या उदगीर येथे मैत्री कार्ड रूमच्याच्या नावाखाली अवैध धंदे चालू असल्याची ओरड सध्या चालू आहे. मात्र या संदर्भात पोलिसांची बोलती बंद आहे, हे असे का? हा काही लोकांना गुढ प्रश्न पडला होता, मात्र त्या ठिकाणच्या खेळाडूंनीच जाहीरपणे सांगितले आहे म्हणे की, या ठिकाणचे अवैध धंद्याला चालना देणारे जे भागीदार आहेत, त्यांनी खेळाडूंना सरळ सरळ बिनधास्तपणे खेळा. कारण या ठिकाणी पोलीस प्रशासनाची धाड पडणार नाही. कारण यामध्ये त्यांचीच भागीदारी आहे. अशा शब्दात सांगितल्यामुळे आणि खेळाडूंना मोठी लालच दाखवल्यामुळे खेळाडू मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन जुगार खेळू लागले आहेत. वास्तविक पाहता कार्ड रूमच्या अटी आणि शर्ती मध्ये कसल्याही पद्धतीच्या जुगाराला परवानगी नाही. तसेच मद्यपानालाही परवानगी नाही. असे असले तरीही जाहिरातबाजी करून या कार्ड रूमवर गेट-टुगेदर पार्टी केली जाते. ज्या ठिकाणी मद्याचा महापूर वाहिला जातो. मद्याचे घोट, जुगारासाठी नोट, मात्र नियतीत खोट अशा पद्धतीचा बाजार जाहिरात बाजी करून चालवला जातो. तरीदेखील पोलीस प्रशासनाला या संदर्भात काहीच माहिती नाही? हे शक्य आहे का? असाही प्रश्न सर्वसामान्य जनता करू लागली आहे.

एक तर सदरील कार्ड रूम एका भाजपच्या नेत्याच्या पदराखालून चालत असल्याने सहजासहजी पोलीस तिकडे फिरणार नाहीत, असा गोंडस समज सुरुवातीला व्यवस्थापनातील काही भागीदारांचा असावा. मात्र नवीन आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची कठोर भूमिका पाहिल्यानंतर त्या व्यवस्थापकांनी तडजोडीची भाषा करून आता चक्क वरिष्ठांनाही या कार्ड रूमच्या नफ्याचा हिस्सा दिला जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

राजकारणी लोक आपल्या पूर्वीच्या आदर्शवादाला पायदळी तुडवत पैशासाठी वाट्टेल ते! अशा पद्धतीची भूमिका घेऊन अत्यंत खालच्या थराला येऊन अवैध धंद्याचे सरदार बनत असल्याची चर्चा चालू आहे. 

आता गेट-टुगेदर पार्टी म्हटल्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रातून पक्के जुगारी आणि नशेडी या ठिकाणी जमा होणारच. मग त्या ठिकाणी रम, रमा, रमी हे सर्वच खुलेआम चालणार ! इतकेच नाही तर या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक गाडीच्या ड्रायव्हरला चार ते पाच हजार रुपये तसेच खेळाडूंना अडीच हजार रुपये प्रोत्साहन पर दिले जात असल्याची ही जाहिरात या मैत्री कार्ड रूमच्या संचालकांनी करून आपण पोलिसांना कसे ग्लासमध्ये उतरवले आहे? हे जाहीरपणे सांगू लागले आहेत. अवैध धंदेवाल्यांची एवढी हिंमत वाढलेली असताना वरिष्ठाकडून मात्र चमकोगिरी करत थातूरमातूर कारवाया करून आम्ही फार कठोर आहोत. अवैध धंदे आम्हाला पसंद नाहीत, असे सांगण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा आता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात चालू आहे. 

लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा फार सक्रिय झाल्याची चर्चा जरी असली तरीही त्यांना उदगीर मध्ये चालू असलेल्या मैत्री नावाच्या जुगार अड्ड्याबद्दल काहीच माहिती नाही? असे म्हणणे म्हणजे निव्वळ बावळटपणाचे ठरणार आहे. एकूण यंत्रणाच जर खिशात घातली गेली असेल तर थातूरमातूर कारवाई करून छोट्या छोट्या जुगार खेळणाऱ्या लोकांना चव्हाट्यावर आणण्यात कोणता मोठेपणा आहे? याचे आत्मपरीक्षण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. नांदेड परिक्षेत्राला शहाजी उमाप पोलीस उप महानिरीक्षक म्हणून आल्यानंतर लातूरकरांना खूप आनंद झाला होता. कारण शहाजी उमाप यांनी लातूरमध्ये असताना आपली झलक दाखवली होती. आपण गुन्हेगारांच्या विरोधात आहोत, अवैध धंद्याच्याही विरोधात आहोत, हे दाखवण्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. मात्र दुर्दैवाने त्याच शहाजी उमापांच्या कार्यक्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त केले जात आहेत, तरीही ना पोलीस उपमहानिरीक्षकांचे पथक तिकडे फिरकत नाही. ना ही पोलीस अधीक्षकांच्या पथकाला त्या अवैध धंद्याच्या ठिकाणाचा पत्ता नाही. असे होऊ शकेल का? आणि जर इतके सारे खुलेआम जाहिरात बाजी करून चालू असेल तर सर्वसामान्य नागरिकांना खुलेआम जी चर्चा चालू आहे त्या चर्चेवर विश्वास वाटणे साहजिक आहे. 

लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा अवैध धंद्याचा अड्डा म्हणून सध्या मैत्रीकडे पाहिले जात आहे. असे असताना देखील कोणताही कर्तबगार अधिकारी तिकडे फिरकायला तयार नाही. ही त्यांची कमजोरी आहे की लाचारी? हेही कळायला मार्ग नाही. 

राजकारणी लोकांचे चिल्ले पिल्ले, सटर फटर कार्यकर्ते आणि त्यांच्या मागेपुढे फिरण्यामध्ये धन्यता मानणारे काही ढेरपोटे हे सर्वजण पोलीस आपल्या खिशात असल्याचीही वाच्यता करत आहेत. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांच्या एकूण प्रतिमेला काळीमा फासली जात नाही का? असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अशी चर्चा सुरू असताना वरिष्ठांना या संदर्भात काही कारवाई करावी असे का वाटत नाही? यामागे काय गुढ असेल? शिवाय निव्वळ हाकेच्या अंतरावर असलेल्या उदगीर ग्रामीण पोलिसांनाही या संदर्भातली माहिती नाही, असे म्हणून ग्रामीण पोलीस हात वर करू शकत नाहीत. आणि जर ते तसे करत असतील तर निश्चितपणे कुठेतरी पाणी मुरते हे निश्चित आहे. 

जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून जेव्हा करमणुकीसाठी म्हणून कार्ड रूमला परवानगी दिली जाते, तेव्हा त्या कार्ड रूम मध्ये मद्यपान चालणार नाही. अशी स्पष्ट अट टाकलेली असते. शिवाय त्या ठिकाणी तिरट नावाचा जुगार खेळण्याला प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यासोबतच इतरही अवैध धंद्याला प्रतिबंध केलेला आहे. शिवाय सदरील कार्ड रूम रात्री दहा वाजल्यानंतर बंद होणे अपेक्षित असते. मात्र रात्रंदिवस खुल्लम खुल्ला जेव्हा अवैध धंदे चालतात, तेव्हा लोकांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहात नाहीत. 

अशा अवैध धंद्यामध्ये आपण माहीर आहोत, असे सांगून काही पैसेवाल्या मंडळींना वेड्यात काढून दलाल अशा कार्ड रूमच्या लायसन्सच्या माध्यमातून नको ते धंदे करत असल्याचीही ओरड सध्या परिसरात चालू आहे. इतके सारे असताना देखील ना ते दलाल थांबतात, ना पोलिसांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर जी हिस्सेदारीची भाषा बोलली जात आहे, त्यात काही तथ्य आहे की काय? अशी शंका यायला बराच वाव आहे.

Post a Comment

0 Comments