*महात्मा फुले यांचे साहित्य हीच परिवर्तनाची लेखणी : प्रा. डॉ. सुरेश शिंदे*
*महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताहातील पहिले पुष्प*
उदगीर : (जाधव श्रीधर) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताहाच्या निमित्ताने महात्मा जोतिबा फुले यांच्या साहित्यदृष्टिकोनावर आधारित एक प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुरेश शिंदे यांनी “महात्मा जोतिबा फुले यांच्या साहित्यातील जाणिवा” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. शिंदे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, महात्मा जोतिबा फुले यांनी मराठी साहित्याला एक वेगळी दिशा दिली. त्यांच्या साहित्याची निर्मिती ही समाजातील वास्तव अनुभवांवर आधारित होती. समाजातील रूढी-परंपरा, अन्यायकारक व्यवस्था, बहुजन समाजावर होणारे अत्याचार आणि स्त्रियांची दुर्दशा यांचा त्यांनी आपल्या लेखनातून कठोरपणे विरोध केला.
फुले यांनी केवळ साहित्यनिर्मितीच केली नाही, तर आपल्या कर्तृत्वातून समाजसेवेचा नवा आदर्शही निर्माण केला. मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करणे, पाणवठे सर्वांसाठी खुले करणे, सतीप्रथेसारख्या कुप्रथांविरुद्ध लढा देणे अशा विविध कार्यांमधून त्यांनी समाजात नवा पायंडा घातला. त्यांनी अनेक इंग्रजी ग्रंथांचे वाचन करून आपल्या विचारसरणीला व्यापकता दिली.
त्यांच्या साहित्यातील नायक हे सामान्य बहुजन समाजातील दुःख भोगणारे, अन्यायाविरुद्ध लढणारे व्यक्ती होते. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना त्यांनी आपल्या लेखणीतून न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे साहित्य हे केवळ लेखन नसून एक सामाजिक चळवळ ठरते.
या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने एक अभिनव उपक्रम राबवत इयत्ता बारावीत शिकणाऱ्या कु. सायली कुलकर्णी हिला कार्यक्रमाचे अध्यक्षपद देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. एम. सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागाराळकर यांनी मानले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष महादेवराव नौबदे, सदस्य शिवराज वल्लापुरे, दिलीप चौधरी, रवी पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समता सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानाने उपस्थितांना सामाजिक जाणीवा आणि प्रेरणा दिली.

Post a Comment
0 Comments