Type Here to Get Search Results !

समाधान शिबिरातून शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना गतिमान प्रशासकीय सेवा उपलब्ध - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

 समाधान शिबिरातून शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना गतिमान प्रशासकीय सेवा उपलब्ध - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील



▪️समाधान शिबिरातून नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे समाधान होईल.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराला किनगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर, . (श्रीधर जाधव).... राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी सर्व महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरामुळे नागरिकांना वेगवान प्रशासकीय सेवा मिळतील, गतीशील प्रशासनाचे हे एक उत्तम उदाहरण असून, नागरिकांनी आपल्या समस्या आणि तक्रारी या व्यासपीठावर मांडाव्यात, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.


अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे आयोजित समाधान शिबिराचे उद्घाटन सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


या प्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, जिल्हा परिषद सदस्य प्रतिक्षा गुट्टे, अश्विन नागराळे, पंचायत समिती सदस्य सुरेखा मुंडे, अयोध्या केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, किनगावचे उपसरपंच विठ्ठल बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून सातबारा दुरुस्ती, शेत रस्ते व पाणंद रस्ते विषयक मोहीम राबविण्यात येत आहे. त्याबाबत आवश्यक माहिती व मार्गदर्शन शिबिरात मिळणार आहे. यासोबतच विविध शासकीय विभागांच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्टॉल उभारण्यात आले असून नागरिकांनी या स्टॉल्सला भेट द्यावी. महसूल विभागाकडून मिळणाऱ्या विविध दाखल्यांची, आधारकार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री श्री. पाटील यांनी केले.


महसूल विभाग अधिक लोकाभिमुख : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे


महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांशी थेट नाळ जुळलेला विभाग आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांना एकाच छताखाली महसूल विभागाच्या विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देऊन शासनाच्या योजना जनतेच्या दारी पोहचवण्याचा प्रयत्न समाधान शिबिराच्या माध्यमातून होत आहे, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी शासन विविध योजना राबवत असून, महिलांनी त्याचा लाभ घेऊन सक्षम बनावे. तसेच युवकांनी कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराकडे वळावे. कृषी आणि व्यवसायामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.


उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी यावेळी अकृषिक (एनए) परवानगीबाबतच्या नवीन नियमांची माहिती दिली. आता अकृषिक परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच आता अकृषिक परवानगी म्हणून ग्राह्य धरली जाईल. तसेच दरवर्षी भरावा लागणारा अकृषिक कर आता एकदाच भरावा लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगारकर यांनी केले. अहमदपूर तालुक्यातील सर्व महसूल मंडळात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात किनगावपासून आज झाली आहे. महसूल विषयक विविध दाखले, सेवांचा लाभ शिबिराच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.


विविध प्रमाणपत्रे, योजनांच्या लाभ पत्राचे वितरण


किनगाव येथील समाधान शिबिरामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते नागरिकांना विविध प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांच्या लाभ पत्राचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. यामध्ये डिजिटल सातबारा, नव्याने नोंद आणि दुरुस्त करण्यात आलेले सातबारा, अंत्योदय कार्ड, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे मंजुरी प्रमाणपत्र, संजय गांधी योजना प्रमाणपत्राचे यावेळी वितरण करण्यात आले. तसेच महिला व बालविकास विभागामार्फत बेबी किट वाटप करण्यात आले. यावेळी विविध शासकीय विभागांच्या स्टॉल्सला मान्यवरांनी भेट दिली.


जागतिक महिला दिनाच्या पूर्वदिनी झालेल्या या शिबिरात मोहिब काद्री यांचे आर्थिक साक्षरता विषयावर व्याख्यान झाले. सूत्रसंचालन प्रा. रामलिंग तत्तापुरे यांनी केले, ग्राम महसूल अधिकारी अविनाश पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments