तोतया पोलीसाचा पर्दाफाश; “मी अधिकारी” म्हणत लाखोंची फसवणूक करणारा सराईत आरोपी जेरबंद – ₹४.३० लाख रोख जप्त
लातूर,
लातूर जिल्हा पोलीस दलाने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत आरोपीकडून तब्बल ₹४ लाख ३० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याच्याकडून इतर जिल्ह्यांतील अशाच प्रकारच्या गुन्ह्यांचाही तपास सुरू आहे.
लातूर जिल्ह्यात अलीकडील काळात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई तीव्र केली होती.
दि. २३ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लातूर शहरात गस्त घालत असताना, नवीन रेणापूर नाका परिसरात एक इसम स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव विजय अनिरुद्ध कदम (वय २५, रा. परभणी) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ₹४,३०,०००/- इतकी रोख रक्कम आढळून आली. सदर रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली.
सखोल चौकशीत आरोपीने अत्यंत धक्कादायक माहिती उघड केली. तो वर्तमानपत्रांमधील चोरीच्या घटनांची माहिती गोळा करून संबंधित फिर्यादींचे मोबाईल क्रमांक मिळवत असे. त्यानंतर तो त्यांच्याशी संपर्क साधून स्वतःला “पोलीस अधिकारी” असल्याचे सांगत असे. विश्वास निर्माण करण्यासाठी तो यूपीएससी मुलाखतीचा व्हिडिओ दाखवत असे तसेच बनावट पंचनामा तयार करून त्यावर सही घेत असे. “चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळवून देतो” असे आमिष दाखवत तो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे.
अहमदपूर येथील एका फिर्यादीकडून आरोपीने अशाच प्रकारे संपर्क साधून ₹५ लाखांची फसवणूक केली होती. त्यापैकी ₹७० हजार खर्च करून उर्वरित ₹४.३० लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
चौकशीत आरोपीने कबूल केले की, तो मागील दोन वर्षांपासून नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे फसवणूक करत होता. त्यामुळे या प्रकरणी इतर गुन्ह्यांचा तपास सुरू असून, संबंधित पोलीस ठाण्यांशी समन्वय साधण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन अहमदपूर येथे गुन्हा क्रमांक १४२/२०२६ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, तसेच संजय कांबळे, सुरेश कलमे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, शैलेश सुडे, पाराजी पुटटेवाड, तुळशीराम बरुरे आणि महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांचा सहभाग होता.
आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी अहमदपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, लातूर जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पैसे मागत असल्यास तत्काळ सावध राहावे व अशा प्रकारच्या संशयास्पद व्यक्तींबाबत त्वरित पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी.

Post a Comment
0 Comments