सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नावाखाली ३ हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक रंगेहाथ जेरबंद
लातूर प्रतिनिधी :
शिवाजी विद्यालय, बिटरगाव (ता. रेणापूर) येथील मुख्याध्यापक सूर्यकांत गुंडेराव चव्हाण (वय ५७) यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नावाखाली ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने बुधवारी (दि.११) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
लातूर येथील केशव नगर परिसरातील ५४ वर्षीय सहशिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, शिवाजी विद्यालय बिटरगाव येथील मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण यांनी शाळेत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नावाखाली तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच रक्कम न दिल्यास दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण करण्याची भूमिका घेतली होती. यापैकी २ हजार रुपये यापूर्वी दिले असून उर्वरित ३ हजार रुपयांची मागणी करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली.
या तक्रारीची पडताळणी दि.९ मार्च रोजी करण्यात आली. त्यावेळी मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांची लाचेची मागणी केली व यापूर्वी २ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केल्याचे एसीबीने सांगितले.
यानंतर दि.११ मार्च रोजी सकाळी ९.३३ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. शिवाजी विद्यालय बिटरगाव येथील मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच चव्हाण यांनी तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून अंगझडतीमध्ये एक मोबाईल हँडसेटही हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही सापळा कारवाई लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष धनसिंग बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करत आहेत.

Post a Comment
0 Comments