बनावट दारूचा टेम्पो घेऊन येत होती आंतरराज्य टोळी !!
राज्य उत्पादन शुल्क विभागाने बांधली त्यांची मोळी !!
लातूर (एल पी उगीले) महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या लातूर जिल्ह्यात पर राज्यातून स्वस्तातली दारू आणून विक्री करणाऱ्यांचे रॅकेट आहे. अशा पद्धतीची चर्चा होऊ लागली होती. विशेष म्हणजे सदरील दारूही प्रथमदर्शनी बनावट आणि आरोग्याला घातक असल्याचेही बोलले जात होते. या सर्व चर्चेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, सह आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता विभाग) नांदेड विभागाचे उपायुक्त बी. एच. तडवी, लातूर विभागाचे राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक केशव राऊत, उपाध्यक्ष मारुती मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर व्ही कडवे, व्हि.ओ.मुनाळे, यु व्ही मिसाळ, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग चाकूर चे एस पी काळे, एस डी घुले, डी डी साळवी, एस आर राठोड, रामेश्वर माकोडे, शिवराज वाघमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक निलेश गुणाले, गणेश गोले, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, ज्योतीराम पवार, समाधान गिरी, विशाल गायकवाड, विशाल सुडके यांचे एक पथक बनवून त्यांना या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करण्याच्या अनुषंगाने सूचना करण्यात आल्या होत्या.
या संदर्भामध्ये या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी आपले गोपनीय बातमीदार नेमले होते. अशा पद्धतीने अत्यंत घातक असलेली दारू आंतरराज्य टोळी आणत असल्यामुळे सतर्क होऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी मोठ्या जिकिरीने काम करायचे ठरवून नियोजन केले.
यापूर्वी देखील लातूर विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने छोट्या मोठ्या कारवाया केलेल्या आहेत. मात्र आता जास्त सतर्क राहून काम करण्याचे ठरवून त्यांनी बनावट मद्य विक्री आणि तस्करी करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी मोहीम सुरू केली. कर्म धर्म संयोगाने त्यांच्या मोहिमेला यश आले. आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई या पथकाने केली आहे.
यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हाती आलेली माहिती असे की, नागपूर - रत्नागिरी महामार्गावरील औसा - लातूर - अहमदपूर दरम्यान चाकूरच्या जवळ एका टेम्पो मधून मोठ्या प्रमाणात बनावट दारू येत असल्याची माहिती प्राप्त झाली. सदरील माहितीची शहानिशा करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार एका टेम्पो मधून मोठ्या प्रमाणात बनावट दारू येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले, आणि या पथकाने 40 लाखाचा मुद्देमाल शनिवारी रात्री जप्त केला.
या कारवाईमुळे बनावट दारू खरेदी करणारे आणि विक्री करणारे यांना चांगलाच हादरा बसला आहे.
लातूर विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाने औसा ते अहमदपूर दरम्यान बनावट दारूची वाहतूक करणारा टेम्पो चाकूर जवळ पकडला. दरम्यान या संशयास्पद वाटणाऱ्या टेम्पो (MH 09 GH 0633) या टेम्पोला थांबून त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये देशी आणि विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईमध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा जप्त केला आहे. तसेच यावेळी सुनील रामदास सोनवणे आणि रितेश महेंद्रकुमार वाणी या दोघांना ताब्यात घेतले आहे.
सदरील टेम्पोमध्ये देशी दारूच्या 24,400 बाटल्या म्हणजेच जवळपास 244 बॉक्स तसेच विदेशी दारूच्या 7680 बॉटल म्हणजेच 160 बॉक्स दारू व टेम्पो असा एकूण 40 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या मोठ्या सापळ्यामध्ये आंतरराज्य टोळी अडकल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कधी कधी अशा बनावट दारूचा साठा एकत्र करून नंतर त्या त्या परिसरातल्या ऑटो मधून किंवा दुसऱ्या एखाद्या वाहनातून ती बनावट दारू त्या त्या परिसरातील धाब्यावरून विक्री केली जात असल्याची चर्चा सुरू होती.
या चर्चेवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सतर्क झाले होते. त्यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या होत्या. वरिष्ठांनी आपल्यावर फार मोठा विश्वास दाखवला आहे. आपण तो सार्थकी लावून दाखवला पाहिजे. अशा जिद्दीने लातूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कामगिरी करत हा चाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रतिमा उजळली आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही. अशी चर्चा आता जिल्ह्यात चालू आहे.

Post a Comment
0 Comments