वझर गावातील शासकीय कामकाज वेळेत न होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त
तहसील कार्यालयाकडे तक्रार; चौकशीची मागणी
देगलूर | प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील वझर (ता. देगलूर) हे कर्नाटक सीमेवरील गाव असून, येथील ग्रामस्थांना शासकीय कामकाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावात नियुक्त असलेले ग्रामसेवक, मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यक अधिकारी हे नियमितपणे गावात उपस्थित राहत नसल्यामुळे अनेक शासकीय कामे रखडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने तहसील कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तहसीलदार, नांदेड यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ग्रामपंचायत स्तरावर होणारी प्रमाणपत्रे, विविध नोंदी, शासकीय योजनांचे अर्ज, कृषी विभागाशी संबंधित कामे तसेच इतर दैनंदिन शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाचे फेरे मारावे लागत आहेत. मात्र संबंधित अधिकारी वेळेवर गावात उपस्थित नसल्यामुळे नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत.
विशेष म्हणजे, वझर हे गाव देगलूरपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असून ग्रामस्थांना किरकोळ कामासाठीही मोठा खर्च व वेळ घालवावा लागत आहे. अनेक वेळा कार्यालयात गेल्यानंतरही अधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
वझर गाव हे कर्नाटक सीमेवर वसलेले असून, या गावात एसटी (आगार) बससेवेची कोणतीही सोय नाही. त्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे आरोग्यसेवा, शिक्षण व शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचणे अधिकच कठीण झाले आहे.
याशिवाय गावात पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या बाबतीतही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाण्याच्या नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून, गावातील रस्ते कायम घाण पाण्याने भरलेले दिसून येतात. नाल्यांचे पाणी रस्त्यावर साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
गावात लहान मुले, महिला व वयोवृद्ध नागरिक मोठ्या प्रमाणावर असून, या सांडपाण्यामुळे डेंगू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या सर्व प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना नियमितपणे गावात उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत, तसेच पाणीपुरवठा, स्वच्छता व दळणवळणाच्या प्रश्नांवर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी अपेक्षा वझर ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments