लातूर जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांच्या
सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; आदर्श आचारसंहिता लागू.
लातूर, दि. १३ : राज्य निवडणूक आयोगाने लातूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असलेल्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी सर्व १० पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, ही आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार १६ जानेवारी २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल. १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ पर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातील. १८ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच २२ जानेवारी २०२६ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. २३, २४ आणि २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३० नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप होईल. मतदान ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत मतदान होईल. मतमोजणी ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी याबाबत नियुक्त सर्व नोडल अधिकारी यांची आढावा बैठक घेवून आवश्यक सूचना दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments