'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती घराघरात पोहचवा -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथील भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीमार्फत आयोजित या कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. या कार्यक्रमाची माहिती घराघरात पोहचवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.
'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात राबविण्यात असलेल्या उपक्रमांचा जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
नांदेड येथे 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर पोहचविण्यासाठी शिक्षण विभागाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. ते अधिक प्रभावी होण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. यासोबतच जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका स्तरावरुनही जनजागृती उपक्रम आयोजित करावेत. या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
नांदेड येथील कार्यक्रमात जास्तीत नागरिकांनी सहभागी व्हावे
शीख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 52 एकरांच्या परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महालंगर, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र, साडेतीनशेहून अधिक स्टॉल्स व आरोग्य शिबिरे उभारली जात आहेत. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातूनही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Post a Comment
0 Comments