Type Here to Get Search Results !

ओला दुष्काळ जाहीर करा! संभाजी ब्रिगेडचे उदगीरात ढोल बजाव आंदोलन*

 *ओला दुष्काळ जाहीर करा! संभाजी ब्रिगेडचे उदगीरात ढोल बजाव आंदोलन*



​उदगीर, जि. लातूर (पूर्व) - संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा, शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करावे आणि प्रति हेक्टरी 60,000 रुपये त्वरित अनुदान द्यावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड व शेतकऱ्यांच्या वतीने सोमवार, दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी उदगीर येथील विद्यमान आमदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या कार्यालयासमोर 'ढोल बजाव' तीव्र आंदोलन करण्यात आले. सरकारला जागे करून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.


*​शेतकरी संकटात, आत्महत्येचा धोका*


​ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांची सर्वच पिके नष्ट झाली असून, अनेक जण बेघर झाले आहेत. पशुधन, घरे, शेती आणि शेती साहित्य मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. निसर्गाच्या या अस्मानी संकटापुढे आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. या परिस्थितीत सरकारने भरीव मदत न केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा उद्रेक होण्याची भीती संभाजी ब्रिगेडने व्यक्त केली आहे.


*​संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख मागण्या:*


​संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार माने आणि तालुका अध्यक्ष राजकुमार भालेराव यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनातून सरकारकडे खालीलप्रमाणे सात प्रमुख मागण्या करण्यात आल्या:

​संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा.

​शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 60,000 रुपये अनुदान त्वरित देण्यात यावे.

​शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज त्वरित माफ करण्यात यावे.

​सोयाबीनला प्रतिक्विंटल 10,000 रुपये आणि कापसाला 12,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात यावा.

​पीक विमा त्वरित मंजूर करण्यात यावा.

​शेतकऱ्यांना शेती साहित्य 100% अनुदानावर देण्यात यावे.

​शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी प्रति जनावर प्रति महिना 3,000 रुपये देण्यात यावे.

*​मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा*


​सदरील मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी न झाल्यास संभाजी ब्रिगेड व शेतकऱ्यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 'महाराष्ट्र बंद' व 'रास्ता रोको' आंदोलने करण्यात येतील, असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला.

​या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माने,जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब चिंचोलकर , सचिव मोहनेश्वर विश्वकर्मा, संघटक मेहेबूब सय्यद, सहसचिव व्यंकट थोरे, तालुकाध्यक्ष राजकुमार भालेराव,तालुका उपाध्यक्ष धम्मसागर सोमवंशी,तालुका सचिव सावन तोरणेकर,विधानसभा अध्यक्ष पुंडलिक नागरगोजे, विधानसभा उपाध्यक्ष जनार्दन फड, संघटक सुरज आटोळकर, शहर अध्यक्ष बंटी घोरपडे संभाजी ब्रिगेड ऑटो युनियनचे तालुकाध्यक्ष माधव फड, वकील संघाचे तालुकाध्यक्ष कृष्णाकांत आमगे यांच्यासह शंकर फड, दत्ता केंद्रे, सुदर्शन फड, संदीप जाधव इत्यादी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments