Type Here to Get Search Results !

वाढवणा येथील मातंग स्मशानभूमीला रस्ता द्या - स्वप्नील अण्णा जाधव

 वाढवणा येथील मातंग स्मशानभूमीला रस्ता द्या - स्वप्नील अण्णा जाधव 



उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील एक मोठे गाव असलेल्या वाढवणा या गावातील मातंग समाजाच्या व्यक्तीला मृत्यू झाल्यास संपूर्ण समाजाला मोठ्या त्रासातून जावे लागत आहे. मातंग समाजाच्या व्यक्तींच्या बाबतीत सुरेश भटांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, 

इतकेच मला कळले होते -

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते!

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या,

पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते? 

मी ऐकवली तेव्हाही तुझं माझी हीच कहानी....

मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते! 

ही बाब तंतोतंत तर लागू होतेच होते, मात्र जगण्याने छळले होते तसेच मरनानेही छळले, असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ वाढवणा येथील मातंग समाजातील नागरिकांना वाटू लागले आहे. 


भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, मात्र दुर्दैवाने अद्यापही वाढवणा या मोठ्या गावातील मातंग समाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्याचा रस्ता नसल्याने या समाजातील व्यक्ती मरण पावल्यानंतर सर्व समाजाला तारेवरची कसरत करत, मृतदेह घेऊन जावा लागतो आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. 


सध्या महाराष्ट्र शासनाचा सेवा पंधरवडा चालू आहे, मात्र या सेवा पंधरवड्यात सरकार कुणाला सेवा देणार ? हा प्रश्नच आहे. कारण वाढवणा येथील मातंग समाजाने अधिकारी, लोकप्रतिनिधी अगदी आमदार, खासदार यांना देखील आपल्या व्यथा सांगितल्या आहेत. मात्र या व्यथेला कागदी घोडे नाचउन बगल दिली जाते आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. 


स्मशानभूमी ला जाण्यासाठी रस्ता नसणे यासारखी लाजिरवाणी बाब दुसरी कोणती असू शकते? एका बाजूला विकास झाला म्हणणाऱ्या मतदारसंघात कित्येक वाडी, तांड्याला रस्ता नाही. तसेच कित्येक गावातील स्मशानभूमी ला जाण्यासाठी रस्ता नाही. कित्येक गावातून आणि वाडी, तांड्यातून स्मशानभूमीच नाहीत! यालाच विकास म्हणायचे का? असा प्रश्नही युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी उपस्थित केला आहे. 


राजकीय भाग बाजूला ठेवून सामाजिक जाणीव जपण्यासाठी तरी राज्यकर्त्यांनी या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेणे गरजेचे आहे. जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणार आहे, असे असताना देखील एक दुसऱ्याच्या सुखदुःखाकडे पहावे असे अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधी का वाटत नसेल? एखाद्या समाजातील गोरगरीब लोकांची होणारी ही हेळसांड थांबवावी. अशी भावना राज्यकर्त्यांची का होत नसेल? हा देखील विचार करायला लावणारा प्रश्न आहे. निवडणुका आल्या की मोठ मोठे आश्वासन द्यायची, मते मिळवायची, आणि त्यानंतर अशा गोरगरीब समाजाकडे पाठ फिरवायची. हे आता नित्याचे झाले आहे. 


भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर देखील गाव कुसाबाहेर वस्ती लावून राहायचे आणि तिथे देखील नागरी सुविधांचा अभाव? ही शोकांतिका आहे. किमान माणूस मेल्यानंतर त्याला अंत्यविधीला घेऊन जाण्यासाठी समशानभूमीपर्यंत रस्ता तरी करण्याची नैतिक जबाबदारी ना नेत्यांनी घेतली आहे, ना प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे वाढवणा गावातील मातंग समाज आता आंदोलनाच्या पावित्र्यात आला आहे.


 प्रशासनाकडे वेळोवेळी विनंती करून देखील जर लोक भावनेची कदर होत नसेल तर नाईलाज म्हणून लोकरेटा उभा करणे गरजेचे राहील, त्यादृष्टीने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही स्वप्निल अण्णा जाधव यांनी दिला आहे. 


प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवण्यासाठी त्यांनी वाढवणा येथे काही प्रतिनिधींना नेले होते, परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या संदर्भात लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी देखील पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्या पत्राला देखील केराची टोपली दाखवली गेली आहे. शासनाच्या सेवा पंधरवड्यामध्ये तरी किमान उपेक्षित असलेल्या मातंग समाजाला न्याय मिळावा अशी रास्त अपेक्षा असल्याची खंत याप्रसंगी युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केली आहे.


याप्रसंगी स्वप्नील अण्णा जाधव यांच्यासोबत वाढवणा गावातील माजी सरपंच शिवा हाळे यांच्यासह मातंग समाजातील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments