Type Here to Get Search Results !

काँग्रेस कमिटीच्या प्रदेश कार्यकारणी वर सचिव म्हणून प्रा. उदयसिंह पाटील यांची निवड, लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत आणि सत्कार

 काँग्रेस कमिटीच्या प्रदेश कार्यकारणी वर सचिव म्हणून प्रा. उदयसिंह पाटील यांची निवड, लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत आणि सत्कार 




उदगीर (एल पी उगिले) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकारिणीची फेररचना केली आहे. या फेर रचनेमध्ये उदगीर येथील प्रा. उदयसिंह विठ्ठलराव पाटील यांची निवड सचिव म्हणून केली आहे. प्रा उदयसिंह पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर कार्यकारणी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या एकूण कामकाजाचे मूल्यमापन पाहून त्यांची पदोन्नती करत त्यांना प्रदेश सचिव पदी काम करण्याची संधी दिली आहे. 

                 प्रा. उदयसिंह पाटील यांचे आजोबा कै. गोविंदराव पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि मराठवाडा मुक्ती संग्रामातील सक्रिय सहभाग आजही लोकांना आठवतोय इतकेच नाही तर त्यांच्या आमदारकी च्या कार्यकाळात त्यांनी केलेली लोककल्याणकारी कार्य लोकांच्या स्मरणात आहेत. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रा. उदयसिंह पाटील वयाच्या 18 व्या वर्षापासून काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहिले आहेत. त्यांच्या या चळवळीतील सहभागामुळे त्यावेळेस देखील युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. त्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळ्या पदावर कार्य केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर प्रदेश प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले. 

कै. गोविंदराव पाटील सतत दोन वेळा सन १९६८ ते १९८० या कार्यकाळात महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. कै. वसंत दादा पाटील आणि कै. शंकररावजी चव्हाण यांचे निकटवर्ती म्हणून उभ्या महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. महाराष्ट्र लोक लेखा समितीचे विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी केलेले काम देखील उल्लेखनीय आहे. 

काँग्रेस पक्षातील चढ-उतार प्रत्यक्ष पाहत असताना पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत तळमळीने पक्ष संघटन बांधणीसाठी प्रा. उदयसिंह पाटील यांनी फार मोठे योगदान दिले आहे. अगदी युवक काँग्रेसमध्ये असताना देखील त्यांच्यावर नगरपरिषद निवडणूक गेवराई, माजलगाव, परळी या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीचा समन्वयक म्हणून पाठवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी केलेले कार्य काँग्रेसला बळकटी देणारे ठरले आहे. 

एक उत्कृष्ट खेळाडू असलेल्या प्रा. उदयसिंह पाटील यांनी महाराष्ट्र स्टेट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचा पदाधिकारी म्हणूनही कार्य केले आहे. उदगीर सारख्या ग्रामीण भागामध्ये गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या पाल्यांना व्यवसाय अभिमुख शिक्षण मिळाले पाहिजे, असा दृष्टिकोन ठेवून डी.टी. एड., नर्सिंग, बीसीए, बीसीएस इत्यादी कोर्सेस काढून महाविद्यालयातून ज्ञानदानाचे कार्य ते अविरतपणे करत आहेत. प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेचा राष्ट्रीय महासचिव म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 84 वा अधिवेशनामध्ये 2018 साली त्यांनी दिल्ली येथे सहभाग घेऊन उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची आणि समाजसेवेची पावती म्हणूनच त्यांना पदोन्नती देऊन प्रदेश काँग्रेसच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

संघटन कुशल नेतृत्व असलेले प्रा. उदयसिंह विठ्ठलराव पाटील यांच्या या निवडीबद्दल मराठवाड्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये त्यांचा मित्रपरिवार दांडगा असून त्यांच्या या निवडीबद्दल ठिकठिकाणी त्यांचा सत्कार आणि स्वागत होत आहे. 

आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा. उदयसिंह पाटील यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने माझ्यावर विश्वास दाखवून फार मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील मोठ्या जिद्दीने आणि निष्ठा ठेवून केलेल्या कामाची ही पावती आहे, असे मी समजतो. पक्ष श्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी माझ्या सर्व सहकारी मित्रासह मराठवाड्यामध्ये काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसची ध्येयधोरणे अत्यंत उत्कृष्ट असून सर्वधर्मसमभाव हा विचार काँग्रेस पक्षाचा असल्याने राष्ट्रहित आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी काँग्रेस पक्षच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाऊ शकतो. काँग्रेसचे विचार घराघरात पोहोचवणे गरजेचे झाले आहे. अफवा आणि अपप्रचार, खोट्या घोषणा अशामुळे नवी पिढी धर्मांध धोरणाकडे वळू लागली आहे. फसव्या घोषणांना बळी पडू लागली आहे. त्या दृष्टीने जनजागृती होणे फार गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता नव्या पिढीवर आलेली आहे. आपल्या भागात तरी आपण जिद्दीने काम करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.

Post a Comment

0 Comments