चौबारा भागात कत्ती आणि वस्तऱ्याने हाणामारी, गुन्हा दाखल
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर शहरातील चौबारा परिसरात भर रस्त्यावर अगदी हिंदी सिनेमाला शोभेल अशा पद्धतीने हाणामाऱ्या होत होत्या. एक जण हातात कत्ती घेऊन तर दुसऱ्याच्या हातात वस्तरा होता, दोघेही रक्तबंबाळ झाले होते. पाहणारे लोक भांडण सोडवण्यापेक्षा व्हिडिओ करून समाज माध्यमावर टाकण्यात धन्यता मानत होते. या संदर्भात कोणीतरी शहर पोलिसांना कळवले. दरम्यान जखमी अरफत रोशन शेख (वय 24 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार किल्ला गल्ली उदगीर) याने उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्या वरून आरोपी सलमान शेख (राहणार किल्ला गल्ली उदगीर) यांच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गुरन 283 /25 कलम 118 (1), 115 (2), 351 (2) (3), 352 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की, या प्रकरणातील आरोपीने फिर्यादीस तुझी काय औकात आहे सुपारी खायची? असे म्हणून शिवीगाळ करून विनाकारण भांडण तक्रार करून फिर्यादीच्या डाव्या कानावर, छातीवर, डाव्या हाताच्या मनगटाजवळ आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी कत्तीने मारून जखमी केले. तू जर माझ्या नादी लागलास तर तुला जिवानिशा खतम करून टाकीन, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. वगैरे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गोलंदाज हे अधिक तपास करत आहेत.
शहरात गेल्या काही दिवसापासून हाणामाऱ्या आणि दहशत पसरवण्याचे प्रकार वाढले आहेत, ऐन बाजारात दुचाकी लावण्याच्या कारणावरून दुकानदाराने एका व्यक्तीला दुकानासमोर दुचाकी लावू नका, असे म्हणले असता दुकानात घुसून दुकानदाराची चांगली धुलाई केल्याचा प्रकार घडला होता. तो प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद होऊन सुद्धा आरोपीवर योग्य ती कारवाई झाली नाही, अशी ओरड चालू आहे.
Post a Comment
0 Comments