Type Here to Get Search Results !

पोलीस ठाणे वाढवणा (बु.) हद्दीत कॉपर वायर चोरी चोरीच्या ०५ प्रकरणांचा उलगडा – ०५ आंतरराज्यीय आरोपी अटकेत; ₹72,880/- मुद्देमाल जप्त.

 पोलीस ठाणे वाढवणा (बु.) हद्दीत कॉपर वायर चोरी चोरीच्या ०५ प्रकरणांचा उलगडा – ०५ आंतरराज्यीय आरोपी अटकेत; ₹72,880/- मुद्देमाल जप्त.



              लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील पोलीस ठाणे वाढवणा (बु.) हद्दीत घडलेल्या कॉपर वायर चोरीच्या सलग घटनांचा उलगडा करण्यात पोलीस प्रशासनास महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारींना जोडलेले कॉपर वायर चोरी करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करून चोरी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

            सदर प्रकरणी पोलीस ठाणे वाढवणा (बु.) येथे गुरनं 78/2026 व 80/2026 अन्वये कलम 303(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. फिर्यादी बालाजी धनराज तरवडे (रा. वाढवणा बु.) व इतर शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 26/03/2026 ते 27/03/2026 दरम्यान मौजे एकुर्का रोड परिसरातील साठवण तलावाजवळील डी.पी.वरून सुमारे 1050 मीटर कॉपर वायर (किंमत ₹84,000/-) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. तसेच दुसऱ्या घटनेत डांगेवाडी परिसरातील साठवण तलावावरील डी.पी.वरून 461 मीटर कॉपर वायर (किंमत ₹36,880/-) चोरीस गेले होते. अशा प्रकारे एकूण ₹ 72,880/- किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

             या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक, श्री अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर श्री अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे वाढवणा (बु.) येथे विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. तपासादरम्यान घटनास्थळांचे बारकाईने निरीक्षण, तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास, तसेच गोपनीय माहितीदार सक्रिय करून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

             तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने वाढवणा पाटी परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे


1)रिहाईस जिवराज पवार (वय 24 वर्ष)


2)सुजेश नवाब पवार (वय 26 वर्ष)


3)दुकीस मलबकस पवार (वय 35 वर्ष)


4)सासन सार्जन पवार (वय 24 वर्ष)


5)बबू जिवराज पवार (वय 26 वर्ष)


(सर्व रा. सुगवा ललतपुर, ता. रिटी, जि. कटनी, राज्य मध्यप्रदेश)


           असे असून आरोपींनी वाढवणा, अहमदपूर, जळकोट, उदगीर व कमलनगर (कर्नाटक राज्य) परिसरात अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली आहे. चोरी केलेले वायर जाळून त्यातून तांबे वेगळे करून ते विक्रीसाठी वापरण्याची त्यांची पद्धत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


     अधिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की सदरचे आरोपी हे गावाजवळील मोकळ्या जागेत वास्तव्य करून किंवा शेतात कामाच्या बहाण्याने येऊन रेकी करून अशा प्रकारच्या चोऱ्या करत होते.

            अटक आरोपींपैकी रिहाईस जिवराज पवार याच्याकडून सुमारे 23 किलो कॉपर वायर जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींकडून रेडमी, विवो व आयक्यू कंपनीचे एकूण 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. याशिवाय आरोपींकडे सोन्यासारखे दिसणारे “प्युअर गोल्ड 999” असा ठसा असलेले बनावट धातूचे बिस्कीट स्वरूपातील साहित्यही आढळून आले असून ते पितळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या माध्यमातून फसवणुकीचा गुन्हा झाला आहे का याचाही तपास सुरू आहे.

              तपासादरम्यान आरोपींनी चोरी केलेले तांबे काही भंगार विक्रेत्यांना विक्री केल्याची माहिती समोर आली असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे. तसेच आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध व इतर गुन्ह्यांतील सहभागाबाबत सखोल तपास सुरू आहे.

                 ही संपूर्ण कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे वाढवणा (बु.) चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकामधील तसेच तपासी अधिकारी तुकाराम बळदे, शिवप्रताप रंगवाळ,संजय दळवे , बालाजी आकेमोड, शिवाजी केंद्रे , गोरख कसबे, राजेश कंचे यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांनी दाखविलेल्या तत्परता, समन्वय व व्यावसायिकतेमुळे अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा होणे शक्य झाले.

तसेच पोलिसांना आरोपी धरण्यासाठी पोलीस मित्र आकाश नागपूर्णे , सिद्धेश्वर गुद्दे यांनी सहकार्य केले आहे.

                  सदर प्रकरणातील अटक आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.


नागरिकांना आवाहन 

आपले गावात, गावाशेजारी वास्तव्यास किंवा शेतात काम करण्याच्या बहाण्याने कोणीही अनोळखी व्यक्ती अथवा टोळी निदर्शनास येत असेल व आपणास त्यांच्याबद्दल वाजवी संशय येत असेल तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी.

Post a Comment

0 Comments