देगलूर, नगर परिषद देगलूरच्या DAY-NULM विभागाच्या वतीने शहरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘नारीशक्ती शहर उपजिविका केंद्र’ चे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. विजयमाला बालाजीराव टेकाळे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. महिलांच्या स्वावलंबनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी नगराध्यक्षा टेकाळे यांच्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला नगरसेविका सौ. पल्लवी ध्याडे, सौ. उज्वलाताई पद्यमवार, सौ. अंजलीताई अंकुश देसाई तसेच नगर परिषद देगलूरच्या मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या उत्पादनांची पाहणी केली. उत्पादनांच्या गुणवत्तेचे कौतुक करत अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे त्या पदार्थांची खरेदीही केली.
उद्घाटन प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा सौ. विजयमाला टेकाळे म्हणाल्या की, देगलूर शहरातील बचतगटांच्या महिलांनी उद्योजक बनून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. नगर परिषदेच्या वतीने या उपजिविका केंद्रासाठी भविष्यात अधिक जागेची गरज भासल्यास ती उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.
यावेळी मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नगर परिषदेच्या व्यापारी गाळ्यांच्या लिलावावेळी काही गाळे बचतगटांसाठी राखीव ठेवण्याचा विचार करण्यात येईल. महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात आणि स्वावलंबी बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
नारीशक्ती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा शारदा सुभाष पाटील यांनी उपजिविका केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव सौ. रंजना मुरलीधर कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमाला शहरातील बचतगटांच्या बहुसंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या स्वावलंबनासाठी नगर परिषद देगलूरकडून राबविण्यात येणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments