पालकमंत्र्यांनी कान टोचतात पोलीस ॲक्शन मोडवर ! कोंबिंग ऑपरेशन; मोटार वाहन कायद्याच्या ८६ केसेस, ५८,५०० रुपये दंड वसूल!
लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत काम चुकार पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच इतर विभागाचे ही अवैद्य धंद्याला चालना देणारे अधिकारी, कर्मचारी यांची आपण गय करणार नाही. अशा शब्दात लातूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचे निघत असलेले धिंडवडे चव्हाट्यावर आणून पालकमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सर्व अधिकारी आणि बहुतांश मंत्री व आमदारासमक्ष हे सर्व प्रकार बंद झाले पाहिजेत असेच सांगून दोषी आढळून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितल्यानंतर आता लातूर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे. ट्युशन एरिया भागांमध्ये कोंबिंग ऑपरेशन करून मोठी कारवाई केली आहे.
लातूर शहर हे राज्यभरात शैक्षणिक पॅटर्नसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे दाखल होतात. ट्युशन एरिया परिसरात सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेस बाधा येऊ नये व कोणतीही असामाजिक प्रवृत्ती डोके वर काढू नये, यासाठी लातूर पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जातात.
दिनांक २०/१२/२०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.०० वा. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ट्युशन एरिया परिसरात अचानक कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेत स्वतः पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून रस्त्यावर उतरून कारवाईवर देखरेख ठेवली. उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या समन्वयाने ही कारवाई पार पडली. सदर मोहिमेत शिवाजीनगर पोलीस ठाणे, गांधी चौक पोलीस ठाणे, विवेकानंद चौक पोलीस ठाणे, दामिनी पथक व दंगा नियंत्रण पथकातील एकूण ९ पोलीस अधिकारी, ६० पोलीस अंमलदार व होमगार्ड सहभागी झाले होते.
ट्युशन एरियातील मुख्य रस्ते, गल्ली-बोळ, चौक व विद्यार्थ्यांची वर्दळ असलेली ठिकाणे यांचे संयुक्त निरीक्षण करण्यात आले. विनाकारण जमाव, संशयास्पद हालचाली, विद्यार्थ्यांना त्रास देणारे व्यक्ती यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. संशयितांची नोंद, ओळख पडताळणी व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्यान्वये ८६ केसेस दाखल करून एकूण ₹५८,५००/- दंड वसूल करण्यात आला असून २ फटाका सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. तसेच विनाकारण फिरणे, विद्यार्थ्यांना त्रास देणे, गुंडगिरीची प्रवृत्ती व गैरवर्तन आढळलेल्या ७ जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई ट्युशन एरियामध्ये सतत बेताल वर्तन करणाऱ्या व विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर वचक बसविण्यासाठी करण्यात आली आहे. लातूरमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना “भयमुक्त, सुरक्षित आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण” उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
पोलिसांकडून पुढील काळातही अशाच प्रकारच्या अचानक व व्यापक मोहिमा राबवून असामाजिक हालचालींवर आळा,गुन्हेगारी प्रवृत्तीचे निर्मूलन,विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत.
ट्युशन परिसरात गैरवर्तन, गुंडगिरी अथवा विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कडक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.लातूर पोलीस दल विद्यार्थी सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, शैक्षणिक वातावरण अबाधित राखण्यासाठी सदैव सज्ज आहे, असे पोलीस प्रशासनाने कळविले आहे.


Post a Comment
0 Comments