नांदेडमध्ये अवैध रेती उत्खननावर मोठी कारवाई; १.०७ कोटींचा मुद्देमाल जप्त, सहा आरोपी ताब्यात
नांदेड, दि. १४ फेब्रुवारी २०२६ : नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस उपमहानिरीक्षकांच्या सूचनेनुसार विशेष पथकाने दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता पोलिस ठाणे विमानतळ हद्दीतील मोजे मुगट व ब्राह्मणवाडा शिवारातील हिराघाट परिसरात धाड टाकली. या ठिकाणी दोन टाटा कंपनीचे टिपर, एक जेसीबी मशीन तसेच नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली ४० ब्रास वाळू असा सुमारे ६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस ठाणे विमानतळ येथे गुन्हा क्रमांक ३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५), ४८(७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर त्याच पथकाने पोलिस ठाणे मुदखेड हद्दीतील मोजे मुगट शिवारात आणखी एक कारवाई केली. येथे एक टाटा कंपनीचा टिपर, एक जेसीबी मशीन व नदीपात्रातून बाहेर काढलेली ३० ब्रास वाळू असा एकूण ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस ठाणे मुदखेड येथे गुन्हा क्रमांक २५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन्ही कारवायांमधून ब्राह्मणवाडा व मुगट परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा, साठवणूक व वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष पथकाने एकूण तीन टाटा कंपनीचे टिपर, दोन जेसीबी मशीन आणि ७० ब्रास वाळू असा सुमारे १ कोटी ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत सपोनि श्रीराम माचवाड यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले.
दरम्यान, नांदेड परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलिस ठाण्यास किंवा पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच ‘खबर’ हेल्पलाईन क्रमांक ९१ ५० १०० १०० वर कळवावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.


Post a Comment
0 Comments