महार वतनी जमिनी संदर्भात कायदेशीर हिस्सेदाराकडून उपोषण सुरू
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर शहरा जवळ असलेल्या जमीन सर्वे नंबर 238 व 244 येथील महार वतनी जमिनीसंदर्भात काही गावगुंडांना हाताशी धरून पोलीस प्रशासनातील अधिकारी जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत असल्या संदर्भात कायदेशीर हिस्सेदारांनी वेळोवेळी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला कळविले आहे. या उपरही त्या जमिनीवर येऊन काही गावगुंडांनी महिलांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केली. त्या संदर्भात 20 नोव्हेंबर रोजी तक्रार करून देखील, पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली नाही. उलट पक्षी तक्रारदारांनाच सदरील जमीन तुमची कशावरून? असे म्हणून या मूळ मुद्द्यालाच बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता महिलांना केलेली शिवीगाळ असलेला, हावभाव आणि जातिवाचक शिवीगाळीचा व्हिडिओ पोलीस प्रशासनाकडे दिलेला असताना देखील पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. हे सर्व चित्र पाहिल्यास पोलीस प्रशासन हे गुंडांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे चर्चिले जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्याच पाठिंब्यावर हे सर्व गावगुंड अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
या प्रकरणांमध्ये योग्य तो न्याय मिळावा, आणि संबंधितावर कारवाई केली जावी. अशा पद्धतीची मागणी एका निवेदनाद्वारे उपोषणकर्ते राजकुमार शिवदास गंडारे, उत्तम मारुती पकोळे, बाबासाहेब जनार्दन सूर्यवंशी, महेंद्र तुकाराम सूर्यवंशी यांनी केली आहे. उदगीर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर 8 डिसेंबर पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments