शौर्य दिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा - निवृत्तीराव सांगवे
उदगीर (एल पी उगिले) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या निमित्ताने महापराक्रमी 500 शूर वीरांना आणि त्यांच्या महान पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी मराठवाडा विभागातून लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तसेच दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक निवृत्तीराव सांगवे, भीमराज सेना प्रमुख राजूभाऊ थाटे, भीमराज सेनेच्या महाराष्ट्र प्रमुख जयाताई बनसोडे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केले आहे.
या अनुषंगाने आवाहन करताना निवृत्तीराव सांगवे यांनी स्पष्ट केले की, एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे पेशव्यांच्या जवळपास 28 हजार सैनिकांच्या विरुद्ध केवळ 834 सैनिक लढले आणि जिंकले. ही लढाई पेशव्यांच्या सत्तेच्या अंतासाठी निर्णायक ठरली. महार समाजाच्या सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळे बहुजन समाजासाठी आत्मसन्मानाचे हे प्रतीक ठरले. पेशव्यांच्या उच्च जातीय वर्चस्वाविरुद्ध सामाजिक न्यायासाठी हा लढा दिला आणि विजय संपादन केला. या लढ्यात 500 शूरवीरांचे बलिदान झाले. त्यांच्या पराक्रमाची गाथा पुढील पिढीला आठवणीत राहावी, यासाठी प्रत्येकाने स्वाभिमानाने या शौर्य दिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथील आपल्या अस्मितेच्या विजय स्तंभाला नतमस्तक होऊन त्या विजय स्तंभावर नोंदवलेल्या 500 महापराक्रमी शूरवीरांनाही अभिवादन करावे. विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी या स्मारकाला भेट देऊन या दिवसाला दलित समाजासाठी सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र बनवले आहे. ज्यामुळे हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उसळत असतो. याची जाणीव मराठवाड्यातील जनतेनेही ठेवावी आणि मोठ्या संख्येने शौर्य दिनाच्या या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहून शूरवीरांना मानवंदना द्यावी असेही आवाहन निवृत्ती राव सांगवे यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments