लातूर पोलीस दलात ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ कार्यान्वित — उदगीर येथे उद्घाटन
उदगीर, (प्रतिनिधी) — भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (Bharatiya Nagarik Suraksha Sanhita - BNSS) कायद्यानुसार आता सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेचे गुन्हे असतील, तर त्यांच्या तपासासाठी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत फिरते न्यायवैद्यक वाहन (मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन) या नव्या सुविधा महाराष्ट्रात सुरू करण्यात आल्या असून, या माध्यमातून गुन्हे तपासातील वैज्ञानिक पद्धतींना अधिक गती मिळणार आहे.
या उपक्रमात लातूर जिल्ह्यातील मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आता कार्यान्वित करण्यात आली असून, या व्हॅनचे उद्घाटन आज दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी उदगीर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आवारात पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, दिलीप गाडे तसेच फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि इतर दुय्यम पोलीस अधिकारी उपस्थित होते.
वैज्ञानिक तपासासाठी अत्याधुनिक सुविधा
सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतिक, रासायनिक, जैविक आणि डिजीटल प्रकारचे पुरावे गोळा करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे, रसायने, किट्स आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये दोन अधिकारी आणि चार कर्मचारी कार्यरत असतील.
या सुविधेमुळे पोलीस तपासात पारदर्शकता वाढेल, तसेच गुन्हे तपासाची गती आणि अचूकता सुधारेल, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
ही फॉरेन्सिक टीम उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, वाढवणा, जळकोट, अहमदपूर, किनगाव, रेणापूर, चाकूर आणि शिरूर अनंतपाळ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात मदत करणार आहे.
पुरावे गोळा करण्याची वैज्ञानिक प्रक्रिया
या वाहनाच्या माध्यमातून रक्त, डीएनए नमुने, बलात्कारासारख्या संवेदनशील गुन्ह्यांतील पुरावे, तसेच स्फोटक पदार्थ तपासणी आणि सायबर गुन्ह्यांतील डिजिटल पुरावे तत्काळ गोळा करता येणार आहेत.
या वाहनामध्ये वैज्ञानिक तज्ज्ञ व सहाय्यक कर्मचारी उपस्थित राहणार असून, आवश्यक साधनसामग्रीसह पुरावे संकलनासाठी तत्पर असतील.
सदर व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ती पोलीस यंत्रणेशी थेट जोडलेली आहे. त्यामुळे संबंधित गुन्ह्याचे पुरावे गोळा करताना त्या माहितीचा थेट आदानप्रदान संबंधित पोलीस ठाण्याशी होऊ शकेल.
पुरावे नष्ट करणाऱ्यांना सुटकेचा मार्ग नाही
या नव्या फॉरेन्सिक प्रणालीमुळे पुरावे नष्ट करणे किंवा त्यांच्यात छेडछाड करणे जवळजवळ अशक्य होणार आहे. त्यामुळे आरोपींवर वचक बसेल आणि गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल, असे पोलीस अधीक्षक तांबे यांनी सांगितले.
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची कार्यान्वितीमुळे लातूर जिल्ह्यातील गुन्हे तपास अधिक वैज्ञानिक, पारदर्शक आणि जलद होणार असून, न्यायदान प्रक्रियेत ही एक मोठी सकारात्मक पायरी ठरणार आहे.
---

Post a Comment
0 Comments