नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक भागांत नागरिकांनी रात्री घराबाहेर पडणेही टाळले आहे.
नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्षच झाले, अशी भावना होती. मात्र, आता महापालिकेने अखेर या गंभीर समस्येकडे लक्ष दिले असून शहरात श्वान पकड मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत पकडण्यात आलेल्या कुत्र्यांची वैद्यकीय तपासणी केली जात असून, त्यांचे निर्बिजीकरण (स्टरलायझेशन) आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. ही कारवाई शहराच्या आरोग्यासाठी आवश्यक आणि सकारात्मक पाऊल आहे.
तथापि, याआधीही अशा मोहिमा काही काळ राबवून थांबवण्यात आल्याचा अनुभव असल्याने, यावेळी ही मोहीम सातत्यपूर्ण आणि परिणामकारक राहणार का? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. नागरिकांत अशी कुजबुजही सुरू आहे की, "ही कारवाई फक्त काही दिवसांची दिखाऊ मोहीम तर नाही ना?"
शहरातील जनतेला कायमस्वरूपी दिलासा मिळावा, यासाठी महापालिकेने या मोहिमेचा नियमित पाठपुरावा करणे आवश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Post a Comment
0 Comments