निवृत्ती सांगवे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
उदगीर (एल पी उगीले) उदगीर येथील समाजसेवक तथा मराठवाड्यातील दलित आणि मुस्लिम समाजाच्या ऐक्यासाठी प्रयत्न करणारे, दलित मुस्लिम ऐक्य परिषदेचे संयोजक तथा राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष, भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती संभाजीराव सांगवे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेच्या निमंत्रक मंडळांनी घेतली आहे. समाजामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून दलित, मागास, अल्पसंख्यांक समाजावर सतत अन्याय, अत्याचार होत आलेला आहे. त्याला वाचा फोडण्याचे काम राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषद करते. या परिषदेच्या वतीने दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. क्रांती दिन 9 ऑगस्ट च्या निमित्ताने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे आणि क्रांती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील दलित मुस्लिम समाजासाठी आपले आयुष्य वेचणारे निवृत्ती संभाजीराव सांगवे यांना देश पातळीवरील "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा राष्ट्रीय पुरस्काराने" सन्मानित केले जाणार आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या शुभहस्ते या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेशचे खा. भाई चंद्रशेखर आजाद, मिझोरामचे खा. रिचर्ड वनलालमंगाईहा, उत्तर प्रदेशचे खा. मौलाना हबीबुल्ला नादवी, महाराष्ट्राच्या खा. वर्षाताई गायकवाड, पंजाबचे खा. सुखजींदरसिंह रंधावा इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देशातील प्रत्येक राज्यातून सामाजिक जाणीव जपणाऱ्या समाजसेवकांना त्यांच्या कार्यक्षेत्रा प्रमाणे राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेचे अध्यक्ष राहुल उंबाळे यांच्या वतीने राष्ट्रीय निमंत्रण अब्दुल बशीर माजीद यांनी कळविले आहे.
निवृत्ती संभाजीराव सांगवे हे गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर आहेत. दलित आणि अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी भारतीय दलित पॅंथर किंवा राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये टोकाचे पाऊल उचलून अन्याय आणि अत्याचार झाला. त्यावेळी नामांतराच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून निवृत्ती सांगवे यांनी दलित चळवळीतील कार्यकर्त्यांना आधार दिला, इतकेच नाही तर दलित समाजातील ज्या ज्या समस्या असतील, त्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या काळात दलितांच्या झोपड्या ही जाळण्यात आल्या होत्या, तर काही आंदोलकांना बलिदान द्यावे लागले होते. तशा परिस्थितीमध्ये आपले व्यक्तिगत शिक्षण सोडून त्यांनी समाजातील तरुणांना आधार देण्यासाठी संघटनात्मक कामाला प्राधान्य दिले. त्यानंतर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार दलितावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही त्यांनी गाव पातळीवर मोहीम राबवली.
संघटनेतून काम करणे थोडेसे कठीण जात आहे, असे वाटल्यानंतर प्रत्यक्ष राजकारणात येऊन काम करावे. असे वाटल्यावर त्यांनी सक्रियपणे राजकारणात भाग घेतला. नगरपरिषद निवडणुकीमध्ये दोन वेळा विजयश्री मिळवली. त्यांच्या कार्यकाळात दोन वेळा नियोजन व विकास सभापती म्हणून उत्कृष्ट कार्य केले. शहराच्या विकासाचा आराखडा त्यांनी तयार केला होता. त्यांच्या कार्यकाळात दलित आणि इतर मागास प्रवर्गातील जनतेला शासनाच्या लोककल्याणकारी योजनाचे लाभ मिळाले पाहिजेत. यासाठीही त्यांनी जीवापाड प्रयत्न केले. या सर्वाचा परिणाम म्हणूनच की काय? त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल वाटप करण्यात आले. आजही ज्यांना घरकुल मिळाले, ते लोक निवृत्ती सांगवे यांचे नेतृत्व विसरू शकत नाहीत.
मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. मात्र गरिबीमुळे, शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने मुस्लिम समाजातील कित्येक गरीब लोक शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर आहेत. त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यासाठी आरक्षण मिळाले पाहिजे, त्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. यासाठी आंदोलनात्मक पवित्र उचलत धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण अशीही आक्रमक भूमिका घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.
कोरोना काळात गोरगरिबांना अन्नधान्याची कीट वाटप करणे, तसेच दलित मुस्लिम समाजातील गरीब कुटुंबाला त्यांच्या घरातील मुला मुलीच्या विवाहप्रसंगी संसार उपयोगी साहित्याचे वाटप करणे असेल किंवा सरळ त्यांना अर्थसहाय्य करणे असेल, किंवा या कामांमध्येही त्यांनी नेहमी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या परीने जनतेला अर्थसहाय्य करण्याची क्षमता ठेवून लोकांचे हित जपणारा नेता म्हणून दलित आणि मुस्लिम समाजातील जनता त्यांच्याकडे पाहत आहे. गोरगरिबांचा मसीहा म्हणून ते ओळखले जातात. गरजू आणि सामाजिक भान ठेवणाऱ्या लोकांसाठी ते सतत मदतीचा हात पुढे करत असतात. त्यामुळे एक यशस्वी राजनेता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच त्यांना ओळखले जाते. अशा कार्यकर्त्याच्या सामाजिक कार्याला सन्मान देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येत असल्याचेही राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेचे निमंत्रक अब्दुल बशीर माजीद यांनी कळवले आहे.

Post a Comment
0 Comments