उदगीर तालुक्यातील जकनाळ येथे खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून गांधीगिरीने आंदोलन
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील मौजे जकनाळ या गावाला जायचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने जो कच्चा रस्ता होता, त्या रस्त्यावर जागोजागी खड्डे झाले आहेत. गेल्या पाच वर्षापासून जकनाळ येथील राजकुमार कारभारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून या खड्ड्यांचा वाढदिवस करून हे खड्डे असेच मोठे मोठे होत जावेत, अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत. सगळ्या वेगळ्या पद्धतीने गांधीगिरीने खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत मोठ्या खड्ड्याजवळ केक कापून ग्रामस्थांना तो खाऊ घालून जणू लोकप्रतिनिधींचा प्रताप जग जाहीर केला आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक गावांना जायला रस्तेच नाहीत. वाडी तांड्यावर तर प्रचंड हाल आहेत. काही तांड्यावरून तर अक्षरश: पावसाळ्यामध्ये आजारी व्यक्तीला बाजेवर झोपउन उचलून आणावे लागते. उदगीर विधानसभा मतदार संघासाठी विकासासाठी भरमसाठ निधी आल्याचे सर्वच लोकप्रतिनिधी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असले तरी, अनेक गावातून नागरी सुविधांचा अभाव असल्याचे नागरिक सांगत आहेत. अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करून कंत्राटदारांनी आपले कर्तुत्व दाखवून दिले आहे. कित्येक रस्ते हे रस्ते बनल्यानंतर एक-दोन महिन्यातच उखडू लागले आहेत. त्या संदर्भात ग्रामस्थांनी कोणाकडे आवाज उठवावा? काही प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्याचे दंडाधिकारी तहसीलदार सांगतात की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जा. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतात त्या रस्त्याचा वाद असल्याने तो लोकप्रतिनिधी कडे जाऊन मिटवा. लोकप्रतिनिधी सांगतात रस्त्याची मान्यता तेव्हाच आलेली आहे. होऊन जाईल लवकरच, मात्र गेल्या पाच वर्षापासून जकनाळचे लोक रस्त्यासाठी गांधीगिरीने खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करतात, त्या संदर्भात कोणाला काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत असल्याने राजकुमार कारभारी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना प्रशासनाच्या थंडपणाबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला आहे.


Post a Comment
0 Comments