Type Here to Get Search Results !

हातगाडा उभारण्याच्या वादातून निर्घृण खून – खुदबई नगरात खळबळजनक घटना, दोघांना अटक

 हातगाडा उभारण्याच्या वादातून निर्घृण खून – खुदबई नगरात खळबळजनक घटना, दोघांना अटक



नांदेड | 19 जुलै 2025 – खुदबई नगर परिसरात हातगाडी उभी करण्याच्या वादातून एका मजुराचा चाकूने निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास घडली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.


खून झालेल्या व्यक्तीचे नाव शेख अजीम (वय अंदाजे ५५-६०) असून, ते हातगाड्यावर व्यवसाय करून उपजीविका करत होते. खुदबई नगर चौकात अमीर मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा पानठेला आहे. शुक्रवारी सकाळी शेख अजीम यांनी त्याच पानठेल्याजवळ हातगाडी उभी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यावरून वाद झाला.


या संदर्भात अजीम यांचा मुलगा शेख आमेर यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, त्यात नमूद केलं आहे की, "आधीच अमीर मोहम्मद यांनी माझ्या वडिलांना धमकी दिली होती की, ‘माझ्या ठेल्याजवळ हातगाडी लावलीस तर तुला खतम करेन.’"


या वादाला शुक्रवारी सकाळी उधाण आलं आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी अमीर मोहम्मद आणि त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने शेख अजीम यांच्या पोटावर चार-पाच वेळा वार करून त्यांचा जागीच खून केला.


घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अभिनाशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक आणि स्थानिक पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व संपूर्ण परिसराची पाहणी केली.


शेख आमेर यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अमीर मोहम्मदसह चार आरोपी व इतर काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे व पथकाने तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.


ही घटना संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारी ठरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments