१ रुपयात पिकविमा ही फसवी योजना का बंद झाली?” – युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विवेक पंडितराव जाधव यांचा सवाल
उदगीर (प्रतिनिधी):
“महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू केलेली ‘१ रुपयात पिकविमा’ योजना अचानक बंद का केली गेली? आणि यावर्षी शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे पिकविमा निशुल्क भरता यावा यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या?” — असा थेट सवाल विवेक पंडितराव जाधव, तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस, उदगीर यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनासमोर उपस्थित केला आहे.
उपविभागीय अधिकारी, उदगीर यांना दिलेल्या निवेदनात, जाधव यांनी शासनाच्या धोरणांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, “१ रुपयात पिकविमा” ही योजना फक्त शाब्दिक गाजावाजा होती. प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालाच नाही आणि यावर्षी तर योजना थेट बंद करून पुन्हा शेतकऱ्यांवर प्रीमियमचा पूर्ण भार टाकण्यात आला आहे. ही पद्धत शेतकरीविरोधी असून, शासनाने निवडणूकपूर्वी शेतकऱ्यांची केलेली दिशाभूल स्पष्टपणे समोर येते.
त्याचबरोबर, जाधव यांनी विचारले की, “ऑनलाइन पिकविमा प्रक्रिया सर्व शेतकऱ्यांना सहज करता यावी यासाठी तालुकास्तरीय मदत समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत का? शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी शासनाने कोणती पावले उचलली आहेत?”
जाधव यांनी शासनाकडे मागणी केली आहे की,
• “१ रुपयात पिकविमा” योजना का बंद झाली, याबाबत स्पष्टीकरण द्यावे
• शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात पिकविमा पुन्हा सुरू करावा
• तालुकास्तरीय मदत समित्यांचे कार्य स्पष्ट करावे
• सर्व शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यास मदतीसाठी सुविधा व मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून द्यावीत
शेतकरी हा देशाचा कणा आहे, त्याची फसवणूक कुठल्याही सरकारने करू नये, असे मतही जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी युवक काँग्रेसचे देवानंद बिरादार, दयानंद आडे, मंगेश येरकुंडे, प्रशांत हुडगे, पवन सूर्यवंशी, प्रविण पटवारी, बालाजी गायकवाड, अ.जा. काँग्रेसचे पद्मसिंह करखेलीकर व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments